रक्षाबंधनानिमित्त आज सोमवारी घरोघरी बहिण-भावांच्या नात्याचा उत्सव साजरा होत असताना, करोना संसर्गामुळे यवतमाळमधील कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या रूग्णांच्या चेहऱ्यांवर काहीशी उदासी होती. मात्र रूग्णालयातील परिचारिकांनी येथे दाखल रूग्णांना राखी बांधून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासोबतच बहीण-भावाचे नाते अधिक अतूट केले. यामुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वातावरण काही काळ भावूक झाले होते.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासोबतच रुग्णांसोबत असलेले ऋणानुबंध जपण्यावर भर दिला जात आहे. करोना संसर्गामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणा-या प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचला पाहिजे, यासाठी येथील सर्व अधिकारी, कर्मचारी, परिचारिका प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. सण, उत्सवाची पर्वा न करता निरंतर सेवा सुरु आहे.
त्यानुसार घरी सण साजरा न करता येथील करोनाबाधित रुग्णांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचा निर्णय येथील परिचारिकांनी घेतला. त्यानुसार पीपीई किट घालून येथे भरती असलेल्या करोनाबाधित रुग्णांना राख्या बांधून परिचारिकांनी बहीण-भावाच्या नात्याला कुठलीही बंधनं नसतात याचा परिचय दिला. यावेळी सर्व रूग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांच्या हातावर राखी बांधली आशिर्वादसुध्दा घेतले. या उपक्रमामुळे महाविद्यालयात आज काही काळ कौटुंबीक वातावरण तयार झाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 8:07 pm