वेळीच खबरदारी घेतल्याने जीवितहानी टळली

पनवेल : वादळामुळे सोमवारी पनवेल एसटी आगाराजवळील भव्य जाहिरात फलक जमीनदोस्त झाला. या फलकाखाली काही झोपडय़ा सापडल्या, मात्र पालिका प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्याने जीवितहानी टळली. मात्र यामुळे भरवस्तीत उभारलेल्या धोकादायक जाहिरात फलकांचा प्रश्न समोर आला आहे.

सोमवारी ताशी ११५ किलोमीटर वेगाने पनवेलमध्ये वारे वाहत असताना सायंकाळी सव्वाचार वाजता बस आगारालगतचा फलक पडण्याची शक्यता स्थानिकांनी पालिका प्रशासनाला कळविली. यानंतर अग्निशमन दल व प्रभाग अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. फलकाखालील तीन झोपडय़ा तातडीने रिकाम्या करण्यात आल्या. जवळची सर्व लोकवस्ती व पादचाऱ्यांना या परिसरात ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता हा भव्य फलक कोसळला. पालिकांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पालिका प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे शहरात भर वस्तीत उभारलेल्या फलकांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०१४ मध्ये नगर परिषद असताना हा फलक उभारण्यात आला होता. मात्र प्रशासनाला नैसर्गिक आपत्तीत निर्माण होणाऱ्या धोक्याचा विसर पडला होता. फलक किती उंचीचा असावा, त्याच्या लोखंडी मनोऱ्यासाठी किती जाडीचे व किती क्षमतेचे पोलाद असावे याचा विचार ठेकेदाराने न केल्याने सोमवारची ही दुर्घटना घडली.

पनवेल नगर परिषद असताना अलवेज अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी हे काम पाहात होती. त्यांच्या कामाची मुदत सहा वर्षांची असल्याने आताही हे काम त्यांच्याकडेच आहे. फेब्रुवा्ररी २०२० मध्ये कामाची मुदत संपली आहे. मात्र करोनामुळे हा विषय बाजूला राहिला. मार्च महिन्याच्या झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अलवेज कंपनीला मुदतवाढ देण्यात आली आहे.

फलकांबद्दल माहिती मिळाल्यावर तातडीने तेथे बचाव व्यवस्था उभारण्यात आली. झोपडय़ा रिकाम्या करण्यात आल्या. फलक उभारलेल्या संबंधित जाहिरात कंपनीविरोधात पनवेल पालिकेला कायदेशीर कार्यवाही करणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. भविष्यात जाहिरात फलक उभारताना सुरक्षेबाबत काळजी घेतली जाईल.

– धैर्यशील जाधव, साहाय्यक आयुक्त, पनवेल पालिका