News Flash

‘बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकनाची प्रक्रिया युध्द पातळीवर पूर्ण करणार’

यावर वेगवान कारवाईसाठी विभागीय मंडळ स्तरावर विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज स्विकारण्यासाठी स्वतंत्र पाच काऊंटर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत.

संग्रहित छायाचित्र

यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विशेषत: विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याचा दावा करीत केलेल्या गुणपडताळणी व पुनर्मुल्यांकनासाठी आवश्यक असणाऱ्या छायांकीत प्रतीसाठीच्या अर्जाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर वेगवान कारवाईसाठी विभागीय मंडळ स्तरावर विद्यार्थ्यांचे ऑफलाईन अर्ज स्विकारण्यासाठी स्वतंत्र पाच काऊंटर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. या माध्यमातून ही प्रक्रिया युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या संदर्भात मंडळाला आदेश दिल्यानंतर पुनर्मुल्यांकन प्रक्रिया जलदगतीने पुर्ण होईल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही खंडागळे यांनी स्पष्ट केले.

मागील वर्षीपेक्षा मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होत आहेत, ही बाब विचारात घेऊन या कामासाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कायम आस्थापनेकडून सुमारे १५ कर्मचारी व रोच्या कामासाठी ३० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत उत्तरपत्रिका पडताळणीच्या कामासाठी सुमारे ८० शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले असून, मंडळ आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या पुनर्मूल्यांकनाचे काम पूर्ण होईपर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती ही शरद खंडागळे यांनी दिली.

बारावीच्या परीक्षा पध्दतीचा पॅटर्न यंदा बदलला आहे. प्रश्नपत्रिका बारावीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित तयार करण्यात आली होती. पर्यायी विकल्प असणारे प्रश्न कमी करण्यात आले होते, त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करावे लागले, तसेच बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांचे प्रमाण कमी करुन दिर्घोत्तर प्रश्नांचे प्रमाण वाढविण्यात आले होते. तसेच या प्रश्नपत्रिकेचे मुल्यमापन नवीन पध्दतीप्रमाणे करण्यात आले असल्यामुळे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना यंदा तुलनात्मकदृष्ट्या कमी गुण मिळाले असावेत असे खंडागळे यांनी सांगितले.

गेल्यावर्षीपर्यंतच्या परीक्षा पध्दतीनुसार विद्यार्थ्यांना भरमसाठ गुण दिले जायचे, या गुणांवर विद्यार्थी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेत प्रवेश घ्यायचे, परंतू त्यानंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेतील सुमारे ५० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण व्हायचे अथवा त्यांना एटीकेटी प्राप्त व्हायची. अभियांत्रिकी विभागातील प्रवेश काढून अनेक विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचे ही वस्तुस्थिती निदर्शनास आली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे विनाकारण वर्ष वाया जायचे व त्यांचे शैक्षणिक नुकसान व्हायचे. त्यामुळे यंदाच्या परीक्षा पध्दतीचा पॅटर्न बदलण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा प्राप्त झालेले गुण हे बदललेली मुल्यमापन पध्दत आणि विद्यार्थ्यांच्या बौध्दिक क्षमतेनुसार झाले, असेही खंडागळे यांनी स्पष्ट केले.

तरीही ज्या विद्यार्थ्यांना आपल्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी आणि पुनर्मुल्यांकन करावयाचे आहे. त्यासाठी विभागीय स्तरावर युध्द पातळीवर काम सुरु आहे. ३ जून २०१९ च्या दुपारपर्यंत एकूण ७८६४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यांपैकी गुणपडताळणीसाठी १,७७७ तर पुनर्मुल्यांकनासाठी आवश्यक असणाऱ्या छायांकित प्रतीसाठी ६०८७ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती खंडागळे यांनी दिली.

गुणपडताळणी व छायांकीत प्रतीसाठीची कार्यपद्धती

गुणपडताळणी व छायांकीत प्रतीसाठी मंडळाकडे प्राप्त होणाऱ्या अर्जासोबत प्रचलीत कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्या दिवसात सादर झालेल्या अर्जाची प्रिंट दुसऱ्या दिवशी प्राप्त होते व त्याआधारे पेपर पुलिंग स्लिप केस पेपर व अन्य रिपोर्ट तयार करुन पुढील कामास सुरुवात होते. स्ट्राँगरुम मध्ये उत्तरपत्रिकांच्या गठ्यामधून उत्तरपत्रिका काढणे, केस पेपरनुसार प्रकरण तयार करणे, अपूर्ण प्रकरण पूर्ण करुन घेणे त्या संबंधीच्या नोंदी ठेवणे. पूर्ण झालेली केस तपासणी अधिकाऱ्यांकडे देणे, तपासून झालेल्या केसेसची वर्गवारी करणे, बदल झालेल्या प्रकरणावर पुढील कार्यवाही करणे. बदल न झालेल्या प्रकरणांच्या उत्तरपत्रिकांचे होलॉक्राफ्ट स्टिकर काढणे, स्टिकर काढलेल्या उत्तरपत्रिका झेरॉक्स काढण्यासाठी पाठविणे. झेरॉक्स प्रती काढलेले प्रकरणाची सर्व पाने झेरॉक्स झाली आहेत की नाही याची तपासणी करणे. उत्तरपत्रिका झेरॉक्स प्रतिच्या प्रत्येक पानावर मंडळाचा शिक्का उमटवणे व तपासून प्रत्येक उत्तरपत्रिकेवर तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी करणे इत्यादी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला उत्तरपत्रिका घेऊन जाण्यासाठी मेसेज पाठविणे अशी सर्वसाधारण कार्यपध्दती आहे व या कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्याला उत्तरपत्रिका देण्यासाठी सुमारे ८ दिवसांचा कालावधी कालावधी लागू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 7:25 pm

Web Title: the process of re evaluation of hsc students will be completed as soon as possible
Next Stories
1 बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थांना प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांची झेरॉक्स कॉपी देण्याचे आदेश
2 पायल रोहतागीकडून शिवरायांची बदनामी करवून घेणारा पडद्याआडचा ‘बिग बॉस’ कोण? – शालिनी ठाकरे
3 निधी चौधरींना बडतर्फ करा, मनपा मुख्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
Just Now!
X