येथून ४२ किलोमीटर अंतरावरील जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून मंजुरीनंतर सुमारे दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल, अशी माहिती कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी शुक्रवारी येथे दिली.
कोकण रेल्वेचा २४ वा वर्धापन दिन शुक्रवारी येथील क्षेत्रीय कार्यालयात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तायल यांनी सांगितले की, जयगड बंदरापासून कोकण रेल्वे मार्गापर्यंत मालवाहतुकीसाठी रेल्वे मार्ग टाकण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय रेल्वे खात्याने मान्यता दिली असून आता हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी ठेवलेला आहे. आगामी दोन-तीन महिन्यांत ही मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर लगेच प्रकल्पाचे काम सुरू होऊन सुमारे दोन वर्षांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या या मार्गामुळे कोकण रेल्वेच्या उत्पन्नामध्ये सुमारे ८० ते १०० कोटी रुपयांची वाढ होईल असा अंदाज आहे. महामंडळाच्या एकूण आर्थिक स्थितीवर याचा मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे. त्याचबरोबर चिपळूण-कराड रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण पुढील महिनाअखेपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पुढील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून या प्रकल्पाचे काम हाती घेतले जाईल. त्यासाठी सुमारे बाराशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून राज्य सरकारनेही गुंतवणुकीत रस दाखवला आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागेल. व्यापारी दृष्टीनेही तो लाभदायी ठरेल, असा विश्वास आहे.
कोकण रेल्वे मार्ग दुहेरी करण्यासाठी सर्वेक्षण चालू असून त्यामध्ये किमान भूसंपादन करावे लागेल, असे स्पष्ट करून तायल म्हणाले की, दुहेरीकरणासाठी सुमारे पंधरा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
त्यासाठी जागतिक बँक आणि जपानच्या वित्तसंस्थेशी प्राथमिक चर्चा सुरू आहे. या मार्गाच्या विद्युतीकरणासाठीही नियोजन चालू आहे.
असुर्डे रेल्वे स्थानक अशक्य
खासदार डॉ. नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोठा गाजावाजा करून असुर्डे रेल्वे स्थानकासाठी गेल्या वर्षी आंदोलन करण्यात आले असले तरी तांत्रिकदृष्टय़ा हे स्थानक होणे अशक्य आहे, असे तायल यांनी या विषयावरील प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. भौगोलिकदृष्टय़ा असुर्डे रेल्वे स्थानक बांधणे म्हणजे हिमालयावर स्कूटर चढवण्यासारखे आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. त्याचबरोबर सावंतवाडीऐवजी मडुरे येथे टर्मिनस बांधणेही तांत्रिकदृष्टय़ा गैरसोयीचे असल्याचे तायल यांनी नमूद केले.

megablock
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे – लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार
Wardha Yavatmal Nanded first train service from Kalamba to Wardha started
१५ वर्षांची प्रतीक्षा संपली; कळंब– वर्धा मार्गावर धावली पहिली रेल्वे
Bullying of the driver and three hours of traffic on the highway
वाहन चालकाची दादागिरी… अन् महामार्गावर तीन तास कोंडी
Nagpur-Nagbhid Railway
व्याघ्रप्रकल्पातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाला अखेर परवानगी, नागपूर-नागभीड रेल्वेमार्गातील अडथळा दूर