राज्यात करोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असून ते ९३.०८ टक्क्यांवर पोहोचलं आहे. दरम्यान, आज दिवसभरात ४,७५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे या आजारापासून खबरदारी घेणे तितकेच महत्वाचे आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज ४,७५७ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ७,४८६ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आज एकूण १७,२३,३७० रुग्ण बरे झाल्याने त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात सध्या एकूण ८०,०७९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.०८ टक्के झालं आहे.

पुण्यात एकाच दिवसभरात ३०९ रुग्ण आढळले, सात जणांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात ३०९ करोनाबाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ७२ हजार २८ इतकी संख्या झाली आहे. दरम्यान, आज सात रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे आजवर एकूण ४ हजार ४९३ मृत्यू झाले आहेत. तर ४४४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आजअखेर १ लाख ६२ हजार ४२३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.