दोन भाऊ वेगळे झाले तरीही नातं तुटत नाही असं सूचक वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. एबीपी माझाच्या माझा ‘महाराष्ट्र व्हिजन २०२०’ या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यात काडीमोड झाला. मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा मुद्दा या दोन्ही पक्षांमध्ये कळीचा ठरला. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापन केली. तसंच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सगळ्या घडामोडींनंतर आता चंद्रकांत पाटील यांनी दोन भाऊ वेगळे झाले तरीही नातं तुटत नाही असं सूचक वक्तव्य केलं आहे.

शिवसेना राज्यात मोठा भाऊ आणि देशात लहान भाऊ, तर भाजपा देशात मोठा भाऊ आणि महाराष्ट्रात छोटा भाऊ असं काहीसं युतीचं समीकरण होतं. निवडणुकीपूर्वी जेव्हा उद्धव ठाकरेंना आता तुमच्यात लहान भाऊ कोण मोठा भाऊ कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा लहान कोण मोठं कोण हे सोडून द्या भाऊ आहोत हे महत्त्वाचं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाला उत्तर दिलं होतं. मात्र बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनाच मोठ्या भावाच्या भूमिकेत होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा प्रचंड वाढल्या होत्या. त्यामुळे भाजपाने आपणच मोठा भाऊ असं म्हणण्यास सुरुवात केली होती. २०१४ च्या निवडणुकीआधी भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटली होती. मात्र निकालानंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. २०१९ च्या निवडणूक निकालानंतर  काय राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यानंतर कशी समीकरणं घडली, बिघडली हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांचे भाऊ मानले जाणारे दोन पक्ष अर्थात भाजपा आणि शिवसेना वेगळे झाले.

आज चंद्रकांत पाटील यांना याबाबत प्रश्न विचारला असता दोन भाऊ वेगळे झाले तरीही नातं संपत नाही असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. शिवसेना एक दिवस परत येईल अशी आशा भाजपाला असावी असंच सांगणारं हे वक्तव्य आहे. आता यावर शिवसेनेकडून काही भूमिका मांडली जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.