राम कदमांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत सर्वानुमते मांडायला हवा, याला शिवसेना पाठिंबा देईलच पण भाजपानेही द्यावा. कारण, कदम यांचे वक्तव्य हा सर्व महिलांचा अपमान आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. ते म्हणाले, भाजपाला जर महिलांच्या प्रश्नांची, महिलांच्या रक्षणाची त्यांच्या प्रतिष्ठेची चाड असेल तर भाजपाने कदमांवर कारवाई करायला पाहिजे. हा काय केवळ शिवसेना, राष्ट्रवादीचा विषय नाही.

भारतीय जनता पक्षावर आता तोंड लपवून बसण्याची वेळ आली आहे. त्यांचे प्रवक्ते कालपासून तोंड शिवून बसले आहेत. एरवी संजय राऊत काही बोलले की दहा प्रवक्त्यांची फौज उभी राहते. पण काल त्यांच्या एका आमदाराने महाराष्ट्रातील लेकी-सुनांचा अपमान केला त्याच्यावर एकही प्रवक्ता मत द्यायला तयार नाही, हे दुर्देव आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपाचा समाचार घेतला.