News Flash

श्रीमंती खेळासाठी हजारो वृक्षांची कत्तल?

महाबळेश्वरात ‘पोलो मैदाना’साठी वनश्रीमंतीला वन विभागाचेच नख

या मदानावर लवकरच प्रदर्शनीय पोलो सामने होणार आहेत.

महाबळेश्वरात ‘पोलो मैदाना’साठी वनश्रीमंतीला वन विभागाचेच नख
श्रीमंती खेळ असलेल्या पोलोच्या विकासाची पालखी क्रीडा विभागाने नव्हे तर थेट वनविभागानेच उचलली असून महाबळेश्वरच्या जंगलातील ‘पोलो ग्राऊंड’च्या विस्तारासाठी वन विभागाच्याच पुढाकाराने हजारो दुर्मीळ वृक्षांची थेट कत्तलच करण्याची योजना आकार घेत आहे. पर्यावरणप्रेमींमधून या विरोधात तीव्र सूर उमटत आहे.
महाबळेश्वर पर्यटनस्थळाची निर्मिती करताना इंग्रजांनी ३.६७ हेक्टर क्षेत्रफळ जागेवर ‘पोलो ग्राऊंड’ही तयार केले. वन विभागाकडे असलेल्या या मैदानावर सध्या हा खेळ खेळला जात नाही. मध्यंतरी राज्यपालांनी या मैदानाला भेट देऊन हा खेळ पुन्हा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर सरकारी यंत्रणा गतिमान झाली.
वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी मदानाची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यात पोलो मदानाच्या विकास आणि विस्ताराची चर्चा झाली. यासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. उपवनसंरक्षक तिचे सदस्य सचिव आहेत, तर जिल्हा क्रीडा अधिकारी, राज्य पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी सदस्य आहेत.
या मदानावर लवकरच प्रदर्शनीय पोलो सामने होणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी या मैदानाचा दोन हेक्टरने विस्तार होणार आहे. त्यासाठी भोवतीच्या वृक्षांची कत्तल अटळ आहे. यातील अनेक वृक्ष शंभर वर्षे जुने आहेत. त्यात दुर्मीळ प्रजातीही आहेत. हा भाग पर्यावरणदृष्टय़ा अतिसंवेदनशील आहे.
त्यामुळे वृक्षतोडीतील कायदेशीर अडचणी लक्षात घेऊन वन विभागाकडूनच या मदानाचा विकास व विस्तार करण्याचा घाट घातला गेला आहे, असे समजते.

महाबळेश्वरची जैवविविधता मोठी आहे. वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. कुक यांनीही इथल्या वनश्रीमंतीचा उल्लेख केला आहे. अगोदरच पर्यटनाच्या नावाखाली या दुर्मीळ ठेव्याचे खूप लचके तोडले गेले असताना आता पुन्हा या श्रीमंती लाडासाठी दुर्मीळ झाडे तुटू नयेत.
– डॉ. संदीप श्रोत्री, पर्यावरण अभ्यासक

या मैदानावर येत्या एप्रिल-मे महिन्यांत आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पोलो स्पर्धा घेतल्या जाणार असल्याने त्याचा विकास आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे.
– सूर्यकांत कुलकर्णी, वनक्षेत्रपाल, महाबळेश्वर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 2:17 am

Web Title: the risk of rare trees in mahabaleshwar jungle
Next Stories
1 चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कन्व्हेअर बेल्टसह कोळशाची राख
2 चांगले वक्तृत्व म्हणजे विचारांचा संवाद – अतुल पेठे
3 कशेडी घाटातील अपघातात १ ठार; ५ जखमी
Just Now!
X