जगण्यानं तिला आणि त्यालाही छळल होतं, यातील मरणानं तिची सुटका केली अन् त्याची मुक्तता केली. अशी अवस्था आरगेच्या रामनगरात राहणाऱ्या सूरज नाईक या १२ वर्षांच्या मुलाची झाली. आई-वडिलांच्या अकाली निधनानंतर अपंग, गतिमंद असलेल्या १५ वर्षांची बहीण पूजाची देखभाल करत जगण्याचा संघर्ष करणाऱ्या सूरजची गेल्या आठवडय़ात पूजाच्या जाण्यानं मुक्तता झाली.

‘लोकसत्ता’ने १७ सप्टेंबर २०१७ रोजी आरगेच्या सूरज नाईक या मुलाचा जीवन संघर्ष मांडला होता. याची दखल घेत समाजातील अनेकांनी या दोघांचा सांभाळ करण्यासाठी तयारी दाखवली. बीडची बालाश्रम, पुण्याची कल्पवृक्ष, मिरजेची माहेर या सामाजिक संस्थाबरोबर दानशूर लोकही मदतीसाठी पुढे आले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहूल रोकडे आणि त्यांच्या विटय़ातील मित्रांनी या मुलांना सर्व ती मदत देण्याची तयारीच नव्हे तर अगदी सहा महिने पुरेल एवढे धान्य, कपडालत्ता दिला. दरम्यान संस्था सांभाळ करण्यास तयार असतानाही सूरजने गाव सोडण्यास नाखुशी दर्शविल्याने त्यावर मर्यादा आल्या. बातमीमुळे अनेक लोकांनी मदतीचा हात दिल्याने आईच्या भावकीतील एक महिला या दोन्हींचा सांभाळ करण्यास तयार झाली. आरगेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधून पूजावर उपचारही सुरू करण्यात आले. चंद्रमौळी झोपडीऐवजी घरकुलमधून घर मंजूर करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्याची तयारी गटविकास अधिकारी रोकडे यांनी दर्शवली. मात्र भावाकडून उपसले जाणारे हे कष्ट न समजणाऱ्या पूजाने गेल्या आठवडय़ात अखेरचा श्वास घेतला. समोर ठेवलेले अन्न काय आहे आणि ते आपण खातोय की एखादा कुत्रा याचीही जाणीव नसणाऱ्या पूजाची खरेतर या यातनातून सुटका झाली. तिच्या मृत्यूनंतर आता सूरजला आश्रमशाळेतच आसरा लाभला आहे. न कळत्या वयात आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा आणि शहाण्या झालेल्या पण गतिमंद असलेल्या बहिणीचा सांभाळ करण्याच्या जबाबदारीतून त्याची खरेतर सुटका झाली. हा आनंद की वेदना याचे उत्तर मात्र ना सूरजकडे ना नियतीकडे.