17 December 2017

News Flash

‘हरि’च्या मुरलीवर जीव जडे

प्रत्येक सूर कानामध्ये साठवत श्रवणानंदाचा आनंद लुटणाऱ्या रसिकांची ‘‘ ‘हरि’च्या मुरलीवर जीव जडे’’ अशी

प्रतिनिधी , पुणे | Updated: December 15, 2012 3:37 AM

प्रत्येक सूर कानामध्ये साठवत श्रवणानंदाचा आनंद लुटणाऱ्या रसिकांची ‘‘ ‘हरि’च्या मुरलीवर जीव जडे’’ अशी भावावस्था झाली. पं. हरिप्रसाद चौरासिया यांनीही श्रोत्यांना परिपूर्ण वादनाची अनुभूती दिली. रसिकांच्या प्रचंड गर्दीने उच्चांक प्रस्थापित केला. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात शुक्रवारी गर्दीने उच्चांक गाठला. आनंद भाटे यांच्या मैफलीनंतर बुजुर्ग गायिका मालिनी राजूरकर यांच्या प्रतिभासंपन्न गायनाने सत्राची सांगता झाली.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित या हीरकमहोत्सवाचा ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक आहे. निवेदक आनंद देशमुख यांनी कलाकारांचा क्रम सांगितला. त्यामुळे पल्लवी पोटे यांच्या गायनानंतर पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे बासरीवादन होणार असल्याचे रसिकांना समजले.  ज्येष्ठ गायक पं. राम मराठे यांची नात पल्लवी पोटे यांच्या गायनाने शुक्रवारच्या सत्राचा प्रारंभ झाला. ‘मुलतानी’ या रागानंतर त्यांनी ‘देस’ रागातील बंदिश सादर केली.
ज्या क्षणाची रसिक आतुरतेने वाट पाहात होते तो क्षण लवकरच आला. पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे स्वरमंचावर आगमन होताच टाळय़ांच्या प्रचंड कडकडाटात त्यांचे स्वागत करण्यात आले. ‘मधुवंती’ रागाचे सौंदर्य हरिजींच्या सहजसुंदर वादनातून उलगडले. त्यांना विजय घाटे यांनी तबल्याची आणि पंडितजींचे शिष्य सुनील अवचट यांनी बासरी सहवादनाची समर्पक साथ केली. बासरीच्या सुरांचा वेध घेत येणाऱ्या तबल्याच्या बोलातून रसिकांनी जुगलबंदीचा अद्भुत अनुभव घेतला. वादनामध्ये तल्लीन झालेल्या पंडितजींची छबी कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्यासाठी छायाचित्रकारांचे ‘क्लिक’वर ‘क्लिक’ सुरू होते. अनेक रसिकांनी ही मैफल मोबाईलमध्ये ‘रेकॉर्ड’ करून घेतली. रागवादनानंतर रसिकांच्या आग्रहास्तव पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी पहाडी धून सादर करून मैफलीची सांगता केली.
बालवयामध्ये ‘आनंद गंधर्व’ ही उपाधी लाभलेले आणि ‘बालगंधर्व’ चित्रपटाच्या पाश्र्वगायनाने लोकप्रिय झालेले स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांनी आपल्या मैफलीसाठी ‘पूरिया कल्याण’ रागाची निवड केली.
ज्येष्ठ गायिका मालिनी राजूरकर यांच्या प्रतिभासंपन्न गायनाने शुक्रवारच्या सत्राची सांगता झाली.      

व्यावसायिक सेवाव्रतींचा सन्मान
सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या हीरकमहोत्सवानिमित्त या महोत्सवाला सहकार्य करणाऱ्या व्यावसायिक सेवाव्रतींचा ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गेली सहा दशके मंडप व्यवस्था पाहणारे ‘गोखले मांडववाले’चे आशुतोष गोखले, ध्वनिव्यवस्थेची धुरा सांभाळणारे ‘स्वरांजली’चे प्रदीप माळी, विद्युतव्यवस्था पाहणारे जयंत थत्ते, सीसीटीव्हीची व्यवस्था पाहणारे सोमनाथ केळकर, मांडवातील कामांची चोख व्यवस्था पाहणारे हितेंद्र नाईक आणि महोत्सवाच्या प्रसिद्धीसाठी काम करणाऱ्या ‘इंडियन मॅजिक आय’चे हृषीकेश देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला.

First Published on December 15, 2012 3:37 am

Web Title: the sawai gandharva bhimsen mahotsav 2012