शाळा म्हणजे असते कशी हेच ठाऊक नसलेल्या मुलीने दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुणांची कमाई केली आहे. ‘होम स्कुलिंग ‘विदेशात प्रचलित असलेल्या पण आपल्याकडे धाडशी म्हणवल्या जाणाऱ्या या आगळ्या शैक्षणिक प्रयोगात कोल्हापूरच्या जान्हवी देशपांडे या विद्यार्थिनीने चमकदार आहे.

आपल्याकडील प्रचलित शिक्षण पद्धतीत ‘चार भिंती’च्या आत दिले जाणारे शिक्षण मानले जाते. विदेशात शिक्षणाच्या बाबतीत ‘होम स्कुलिंग’ हा प्रकार प्रचलित झाला आहे. घरीच शिक्षण म्हणजेच ‘होम स्कुलिंग’. अभ्यास शाळेत न करता घरी केला जातो, करुन घेतला जातो. पालक शिकवतात आणि पाल्य शिकत राहतो. कोल्हापुरातील देशपांडे दाम्पत्यांनी हा धाडशी प्रयोग केला. त्यांची कन्या जान्हवी उर्फ चिऊ हिच्या बाबतीत. हल्ली शाळा, तेथील जादा तास, शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) अशी दहावीच्या विद्यार्थ्यांची दिवसभर धमछाक करणारी अभ्यास, अध्ययन पद्धती रूढ झाली असताना जान्हवीने चोखाळलेला मार्ग वेगळा आणि तितकाच धाडशी होता. या धैर्याला ८४ टक्के गुणांचे गोड फळ शनिवारी लागले.

जान्हवीची आई नीलिमा आणि वडील ऋतुराज हे दोघेही टॉपर. तरीही त्यांनी जान्हवीला शाळेपासून दूर ठेवले. ती बालवाडीत असतानाच शाळेला रामराम ठोकला आणि घरातच धडे गिरवू लागली. आई, बाबा, आजी तिच्या अभ्यास घेत असत. पण हा अभ्यासही घोकंपट्टी करणारा नव्हता, तर अनुभवाचे बोल देणारा होता. म्हणजे, शिवराज्यभिषेक असे ढोबळमानाने पुस्तकी ज्ञान न देता जान्हवीला आईवडील रायगडावर घेऊन जात. तेथे प्रत्यक्ष रायगडाची फिरती करून किल्ले, गड, त्याची रचना, शिवकाळ आदी इतिहासाची खरी ओळख करून दिली जात असे तेच भूगोलाचे. भरती-ओहोटी असे न म्हणता प्रत्यक्ष समुद्रकिनारी नेवून ही प्रक्रिया नेमकी कशी घडते, त्याचे काय परिणाम होतात याचा अनुभवाचा धडा दिला जात असे. संस्कृतचे पाठांतर तेव्हढे करून घेतले. याचवेळी जान्हवी फ्रेंच भाषा शिकली. रवींद्रनाथ टागोर यांच्या गुरुकुल शिक्षण पद्धतीत असे शिक्षण दिले जाते हे समजल्यावर तिने टागोर समजून घेतले. त्यांच्या एका बंगाली कवितेचा अनुवाद केला. भाषा विषयांमध्ये एखाद्या कवितेबद्दल किंवा कथेबद्दल ‘स्वमत’ हे आपलं स्वतःच असायला हवे, येथेही आपण शिक्षकांनीच लिहून दिलेले पाठ करून कसे लिहायचे, असा रोखठोक सवाल जान्हवी पालकांना विचारत असे.

पर्यटन व्यवसायानिमित्त डिसेंबर महिन्यापासून आई पाच महिने घराबाहेर असतानाही जान्हवीने घरी नेटकेपणाने अभ्यास केला. होमस्कुलिंगचा पालकांचा प्रयोग म्हणजे तिच्यावरच मोठी जबाबदारी, पण तिने ती पेलली असल्याचे तिची गुणपत्रिका सांगत आहे. तिच्या या यशाबद्दल नीलिमा देशपांडे यांनी सांगितले की, ‘घोकंपट्टी न करताही लिहिता येण्यासाठी तिला खूप कष्ट पडले. पालक म्हणून आम्ही तिला हव्या त्या सगळ्या सुविधा देऊ, पण त्या स्वीकारता येणं, ताकदीने त्या पेलवणं आणि शिकण्याचा ‘सोहळा’ करणे या सगळ्याचे श्रेय केवळ जान्हवीचे आहे. होम स्कुलिंग प्रयोगात आईवडील वा पाल्य यापैकी एकजरी ढिले पडले तरी सारा मामला बिघडण्याचा धोका असतो. या कसोटीत आम्ही उत्तीर्ण झालो असल्याचा आनंद अधिक आहे.’