पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका करत, महानायक अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांच्यावर देखील त्यांनी मनमोहन सिंग सरकारच्या काळात केलेल्या ट्विटवरून निशाणा साधला आहे. तसेच, या दोघांचेही सिनेमे चालू देणार नाही, त्याचं शूटिंग आम्ही बंद पाडू असा इशारा देखील दिला आहे. यानंतर आता भाजपा नेत्यांकडून नाना पटोलेंच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात येत असून, त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज(शुक्रवार) केंद्रीयमंत्री व  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंनी देखील याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

“काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हिंदी सिनेमाचे महानायक अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचे शूटिंग बंद पाडू अशी धमकी दिली आहे. त्या धमकीचा आम्ही विरोध करतो. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाच्या शूटिंगला रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल.” असं रामदास आठवलेंनी जाहीर केलं आहे.

तसेच, “अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात इंधन दरवाढीवर ट्विट करून विरोध दर्शवला होता. याचा अर्थ असा नाही की आजच्या इंधन दरवाढीवर पण ट्विट करावं. नाना पटोलेंनी अशी धमकी देणं चांगली गोष्ट नाही.” असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

“डिझेल, पेट्रोल आणि गॅसची दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. ज्यावेळी मनमोहन सिंग यांचं सरकार होतं तेव्हा अमिताभ, अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून टिवटिव करायचे आणि टीका करायचे. आज ते का शांत आहेत?,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केली होती.

“महाराष्ट्रात अक्षय कुमार आणि अमिताभ यांचे सिनेमे बंद पाडू”; नाना पटोलेंचा इशारा

तसेच, “अमिताभ आणि अक्षय कुमार यांचे सिनेमे आणि शूटिंग महाराष्ट्रात चालू देणार नाही. ज्या पद्धतीने ते लोकशाही मार्गाने मनमोहन सिंग यांचं सरकार असताना ट्विट करत होते, त्याप्रमाणे आजही मोदी सरकारच्या देशविरोधी धोरणाच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका मांडावी. अन्यथा महाराष्ट्रात सिनेमे आणि शूटिंग बंद पाडू अशी व्यवस्था करणार आहोत”. असा यावेळी नाना पटोलेंनी इशारा दिला होता.

आपल्याच आमदारांना घाबरणारं हे पहिलंच सरकार – देवेंद्र फडणवीस

तर, या अगोदर नाना पटोलेंनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचं शूटिंग बंद पाडण्याच्या दिलेल्या इशाऱ्याला देवेंद्र फडणवीसांनी पब्लिसिटी स्टंट म्हटलेलं आहे. “नाना पटोलेंचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यांना माहितीये की अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर काही बोललं, तर पब्लिसिटी मिळते. यात त्यांचंच भलं आहे. नवेनवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनाही त्यांचं नाव कमवायचं आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की दिवसभर पब्लिसिटी मिळते. शूटिंग कसं आणि कोण बंद करू शकतं? इथे कायद्याचं राज्य आहे. तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही मालक झालात” असं फडणवीस म्हणाले होते.

“राज्य कायद्याचे आहे पप्पा किंवा पप्पूचे नाही”

“नाना पटोले काँग्रेस महाराष्ट्रात आणीबाणी लागू करणार आहे का? सत्ता तुमची असली तरी तुमची मनमानी चालणार नाही. देश घटनेच्या चौकटीत आणि कायद्यानुसार चालतो, तुमच्या मर्जीवर नाही. राज्य कायद्याचे आहे पप्पा किंवा पप्पूचे नाही.” असं भाजपा नेते अतुल भातखळकर म्हणाले आहेत.