१ मेपासून खासगी रुग्णालयांना पालिकेकडून पुरवठा बंद

वसई : वसई-विरार शहरात पुन्हा एकदा लशींचा तुटवडा निर्माण झाला आहे. सोमवारी पालिकेला जेमतेम १० हजार लशींचा साठा मिळाला होता. तो अवघ्या २४ तासांत संपला आहे. जर आणखी साठा मिळाला नाही तर बुधवारी शहरात लसीकरण होणार नसल्याचे पालिकेने सांगितले. दरम्यान, लशींच्या तुटवडय़ामुळे पालिकेने १ मे पासूनच्या लसीकरणाच्या पुढच्या टप्प्यासाठी खासगी रुग्णालयांना लस पुरवठा न देण्याचा निर्णय घेतला आहे.

वसई-विरार महापालिकेच्या १९ तर खासगी १० केंद्रांवर लसीकरण सुरू केंद्र सुरू होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने खासगी केंद्रावरील लसीकरण बंद होते. करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांचा लस घेण्यासाठी कल वाढत आहे. मागणी प्रचंड आणि पुरवठा कमी असल्याने आता पालिकेकडील साठा अपुरा पडू लागला आहे. पालिका सातत्याने शासनाकडे १ लाख लशींची मागणी करत आहे, मात्र प्रत्यक्षात त्यांना ७ ते १० हजार कुप्या त्यादेखील १० ते १२ दिवसांच्या अंतरावर मिळत आहेत. सोमवारी २६ एप्रिल रोजी पालिकेकडे १० हजार लशींच्या कुप्या आल्या होत्या, पण केवळ २४ तासांत या संपल्या. जर लशींचा आणखी साठा आला नाही, तर बुधवारी शहरातील लसीकरण बंद राहील, असे पालिकेने सांगितले.

शहरातील ९१ हजार जणांचे लसीकरण पूर्ण

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्रांमध्ये मिळून एकूण ९१ हजार १५२ लशींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यात ९ हजार ७१ आरोग्य सेवकांना पहिली मात्रा, तर ६ हजार ६९१६ जणांना दुसरी मात्र देण्यात आली आहे. पहिल्या फळीतील ७ हजार ५५४ सेवकांना पहिली, तर २ हजार ४९२ सेवकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

४५ ते ५९ वयोगटांतील १८ हजार ७१६ नागरिकांना पहिली मात्रा,  तर ६० वरील वयोगटातील ३५ हजार ९६४ ज्येष्ठ नागरिकांना पहिली मात्रा दिला, तर ३ हजार ५०१ नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. तर ४५ ते ५९ सहव्याधी असलेल्या ५ हजार २२८ नागरिकांना पहिला डोस दिला तर  १७१० नागरिकांना दुसरा डोस दिला आहे.  एकूणच परिस्थिती पाहता अनेक नागरिक दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. शासनाकडे मागणी करूनही लसपुरवठा होत नसल्याने पालिकेच्या चिंता वाढल्या आहेत. यामुळे लसीकरणाची अखंड मोहीम  कशी राबविणार? अशी भीती निर्माण झाली आहे.

लस मिळत नसल्याने पालिकेपुढे पेच

१ मे पासून राज्यात १८ वयोगटांवरील सर्वाना करोना लस देण्याचा कार्यक्रम शासनाकडून राबविला जात आहे. पण सध्या लसींचा साठाच शासनाकडून उपलब्ध होत नसल्याने हा कार्यक्रम पालिका कसे राबविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या लसीकरण केंद्रांना १ मे पासून  लस न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

सध्या लशींचा साठा उपलब्ध नाही, आम्ही शासनाकडे वारंवार मागणी करत आहोत. सध्या यामुळे लसीकरणाच्या कार्यक्रमावर परिणाम होऊ शकतो.

– डॉ. सुरेखा वाळके,  मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका

आतापर्यंत शहरात झालेले लसीकरण

                  प    हिला डोस          दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी         ९०७१              ६९१६

आघाडीवरील कर्मचारी  ७५५४              २४९२

४५ व ५९ वयोगट       ५२२८                 १७१०

सहव्याधी

६० वर्षांवरील             ३५९६४              ३५०१

४५ ते ५९ वयोगट-      १८७१६