करोना लॉकडाउनमुळे तामिळनाडूत अडकलेल्या राज्यातील विविध भागातल्या नागरिकांना घेवून येणारी श्रमीक स्पेशल ट्रेन आज(मंगळवारी) पहाटे  वर्धा येथे पोहोचल्यानंतर सर्वांना एसटी बसने त्यांच्या गावी सोडण्यात आले.

राज्यातील १ हजार ३४९ नागरिक तामिळनाडूतील ठेणी जिल्ह्यात टाळेबंदीमुळे अडकले होते. त्या सर्वांना घेवून येणारी स्पेशल ट्रेन आज पहाटे वर्धेत पोहोचली. यानंतर विदर्भातील १९२ नागरिकांची लगेचच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात एकाही व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणे आढळून न आल्याने एसटी बसद्वारे त्यांना त्यांच्या गावी रवाना करण्यात आले. यात सात बालकांचाही समावेश होता.

वर्धा येथे शेवटचा थांबा असणाऱ्या या गाडीने यापुर्वी पुणे, मनमाड, परभणी या स्थानकांवर थांबा घेतला होता. त्या ठिकाणी पुण्यातील ३०२, मराठवाड्यातील ७५४ व नाशिकच्या १०१ नागरिकांना सोडण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, नौकरदार व कामगारांचा समावेश होता. विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदीया, यवतमाळ येथील नागरिकांचा समावेश होता. २५ मे रोजी ही स्पेशल ट्रेन मदूराई येथून निघाली होती.