कोल्हापूरमधील कसबा बावडा येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याचा स्लॅब तिसऱ्यांदा उखडला असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. वर्षभरात तीनदा असा प्रकार घडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या रस्ता कामाच्या दर्जाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर शहराचे कसबा बावडा हे उपनगर आहे. येथेच पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे निवासस्थान आहे. येथील पंचगंगा नदीवर राजाराम बंधारा बांधण्यात आलेला आहे. या बंधार्‍यावरून काही प्रमाणामध्ये वाहतूक होते.
मध्यंतरी कोल्हापुरातील शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तेव्हा राजाराम बंधार्‍यावरून अवजड वाहनांची वाहतूक होत होती. यामुळे रस्ता खराब झाला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. त्यातून हा प्रकार घडला असावा असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, यावर स्थानिक नागरिकांचा मुळीच विश्वास नाही. रस्त्याच्या कामाचा दर्जा ढिसाळ असल्यामुळेच असा प्रकार घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे  म्हणणे आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये हा रस्ता वाहून गेला होता. तेव्हा त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. महापूर ओसरलानंतर पुन्हा असा प्रकार घडला होता. तेव्हाही त्याची डागडुजी केली होती. गेल्या आठवड्यात जोरदार पावसामुळे राजाराम बंधार्‍यावरून नदीचे पाणी वाहत होते. यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. पुराचे पावसाचे पाणी ओसरून आठ दिवस होण्याच्या आतच बंधाऱ्यावरील स्लॅब विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक खंडित झाली आहे. या रस्त्याचे काम खराब दर्जाचे झाले असल्याने संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा हा बंधारा जीवितहानीस कारणीभूत ठरेल अशीही भीती व्यक्त केली जात आहे.