कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथील नववधू राजश्री वामन शेटे आणि उस्मानाबाद तालुक्यातील वर परमेश्‍वर भारत जाधव या नवपरिणित जोडप्याने लग्नाचा खर्च टाळून ११ हजार १०० रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. करोनाच्या लढ्यात आपलाही खारीचा वाटा असावा, अशा भावनेतून गर्दी टाळत या जोडप्याने हा अनोखा आदर्श घालून दिला.

उस्मानाबाद तालुक्यातील परमेश्वर भारत जाधव व कळंब तालुक्यातील राजश्री वामन शेटे हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात ठरले होते. मात्र, करोना संकटामुळे विवाहासाठी २० एप्रिलची तारीख घेण्यात आली. मात्र, त्यानंतरही लॉकडाऊन सुरू राहिल्याने वऱ्हाडी मंडळींना एकत्र येणे कठीण झाल्याने जेमतेम मोजक्या नातेवाईकांमध्येच लग्न करणे बंधनकारक होते. त्यातून खर्चही टाळला जात होता. विशेष म्हणजे यातून काही पैशाची बचत होणार होती. त्यासाठी मंगळवारी दोन्ही बाजूने अगदी दहा नातेवाईकांच्या साक्षीनेच लग्न करण्याचे निश्‍चित झाले. वडगाव (ज) येथे हे जोडपे विवाहबद्ध झाले. त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन ११ हजार १०० रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे.

आणखी वाचा- Coronavirus : सोलापुरात चार नवे रूग्ण, एकूण संख्या 37 वर

“करोनाच्या लढ्यात डॉक्टर्स, पोलीस, प्रशासन यांचे मोलाचे योगदान आहे. सामान्य नागरिकांना केवळ घरी बसून प्रशासनाला सहकार्य करायचे आहे. गर्दी टाळण्यासाठी अगदी मोजक्याच पाहुणे मंडळीच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय आम्ही घेतला. तसेच कोरोनाच्या लढ्यात आमचाही खारीचा वाटा असावा, या भूमिकेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ हजार १०० रुपयांचा धनादेश देण्याचं आम्ही ठरवलं,” असं या नवदाम्पत्यानं सांगितलं.