देशभरात करोनाचा व्हायरसचा वाढतो आहे. तसंच लॉकडाउनमुळे मजुरांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. त्यांना आपल्या गावी सरकारने पोहचवले आहे. मात्र यामुळे महाराष्ट्रातल्या विविध कंपन्यांना काम करणे अवघड जाते आहे. अशात आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लॉकडाउननंतर आर्थिक संकट सोडवण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना आवश्यक आहेत, परप्रांतीयांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने  विशिष्ट धोरण आखलं पाहिजे असं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत शरद पवार?

लॉकडाउननंतर आर्थिक संकट सोडवण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना आवश्यक आहेत. सध्याच्या घडीला राज्य सरकार लॉकडाउनची स्थिती शिथिल करत आहेत. पण मजूर, कामगार खेड्यांमध्ये स्थलांतरित झाल्याने कारखाने पुन्हा सुरु होण्याच्या स्थितीत आपण सध्या नाही. त्यांना परत आणण्यासाठी धोरण राबवणं आवश्यक आहे असं शरद पवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सध्याच्या घडीला राज्यात नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळआवे यासाठी नवीन धोरणांचा समावेश गरजेचा आहे. आयात-निर्यात आणि आंतरदेशीय शिपिंग वाढवण्यासाठी व्यावसायिक, उद्योजक आणि क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करण्याचीही आवश्यकता आहे. असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.