उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादळाने हाहाकार माजविला असून शनिवारी रात्री तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांना याचा जबर तडाखा बसला. आपसिंगा, कामठा, कात्री, ढेकरी या गावांना वादळाने अक्षरशः घेरले. शेकडो घरांवरील पत्रे उखडले असून विद्युतखांबांसह जनावरांचे गोठे जमीनदोस्त झाले. या वादळी तडाख्यात अनेक गावातील ग्रामस्थ जखमी झाले असून फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वार्‍याने अक्षरशः रौद्ररूप धारण केले. तब्बल १५ मिनिटे सुसाट वारे सुरू असल्याने अनेक घरांवरील पत्रे उखडले. सर्वाधिक तडाखा आपसिंगा गावाला बसला असून येथील पशुवैद्यकीय कार्यालयासह बिभीषण सुतार, बाहुबली कासार, सचिन जाधव, संजय रोकडे, सिध्दार्थ रोकडे, महादेव गाडेकर, सुनील जांभळे, लक्ष्मीबाई क्षीरसागर, भागवत सोनवणे, राजाभाऊ दिवटे, गोविंद कानवले, रज्जाक शेख, गोपाळ गोरे, इंगळे गुरूजी, नवनाथ घोलकर, नागेश खोचरे यांच्यासह तब्बल ८०० घरांवरील पत्रे उखडून गेले आहेत. शिवारातील द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या असून ७०० शेतातील जनावरांचे गोठे उद्ध्वस्त झाले. कामठा, कात्री, ढेकरी गावातही शेकडो घरावरील पत्रे उखडले आहेत. वादळी तडाख्यात महादेव गाडेकर, ज्योत्सना सोनवणे, प्रवीण भारत सोनवणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. वादळात दीडशेहून अधिक विद्युतखांब जमीनदोस्त झाल्यानंतर वीजपुरवठा खंडीत झाला. तर अचानक तुफानी पावसाला सुरूवात झाल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल झाले. या धक्क्यातून अद्यापही या गावांमधील लोक सावरले नसल्याचे चित्र आहे.