पंतप्रधानांच्या ‘उज्ज्वला’ योजनेच्या लाभाची कहाणी 

जन्मत: आईशी जुळलेली नाळ तुटल्यानंतर तिच्या भावविश्वाची घट्ट गाठ जुळते, ती अपत्याशीच. मुलगा असो की मुलगी, ताजी पोळी खाऊ घालताना चुलीवरील धुरामुळे त्रस्त झालेल्या आईचे कष्ट ते विसरूच शकत नाही आणि गॅसजोडणी आल्यावर मग आईच्या चेहऱ्यावर झळकणारा दिलासा मुलांनाही आनंद देणारा ठरतो. देशातील मातांना ‘उज्ज्वला’ योजनेने असाच दिलासा मिळाला असल्याची जाणीव मंगेश रायमल या युवकाला झाली. आपली ही भावना त्याने मग थेट योजनेचे जनक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे कळविली. मोदींनीही त्याला तात्काळ उत्तर देताना, तुझा व माझा अनुभव सारखाच असल्याचे कळवत मातांना ‘चूलमुक्त’ करण्याची भावना अभिनंदनीय असल्याचे उत्तर दिले.

देवळी तालुक्यातील पिंपळगाव (लुटे) येथील या युवकाचा पंतप्रधानांशी झालेला पत्रसंवाद, महिलेच्या ‘चूल व मूल’ या चिरंतन सत्याला वेगळे परिमाण देणारा ठरावा. अभियांत्रिकी पदवीधर असलेला मंगेश सध्या नागपूरला नोकरी करतो. पण गावच्या, कुटुंबाच्या व आईशी जुळलेल्या आठवणींशी अद्याप त्याचा घट्ट ऋणानुबंध आहे. त्याला ‘उज्ज्वला’ योजनेने उजाळा मिळाला. केंद्र शासनाने ग्रामीण महिलांना चुलीच्या बंधनातून मुक्त  करण्यासाठी सवलतीच्या दराने गॅसजोडणी देण्याची ‘उज्ज्वल’ योजना सुरू केली आहे. त्याला सर्वत्र प्रतिसाद लाभत आहे. चुलीतल्या धुरामुळे दमा व तत्सम व्याधींना बळी पडणाऱ्या महिलांना ‘चूलमुक्त’ करण्याचा हेतू या योजनेमागे आहे.

पंतप्रधानांशी संवाद साधणाऱ्या मंगेशला आईचे चुलीवर स्वयंपाक करणे आठवले. चुलीमुळे होणाऱ्या धुराच्या त्रासाने तो आईशी भांडायचा. डोळ्यात धूर गेल्याने त्रस्त मंगेशला आई म्हणायची, ‘अरे, मी मुद्दाम धूर करते का, लाकडेच ओली आहेत. धूर होणारच. मी काय करू.’ आईच्या या उत्तरावर त्या वेळी समाधानी न झालेल्या मंगेशला आता वाटते की, मला त्रास व्हायचा, मग  तासन्तास चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या आईला किती कष्ट होत असणार. तरी तक्रार नसायची.

पुढे गॅस एजन्सी आली. त्याने वडिलांकडे तगादा लावून जोडणी घेतली. याविषयी आईला असणारी भीती दूर करण्यासाठी तोच तिला प्रशिक्षण द्यायचा. आई सरावल्यानंतर त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला.

स्वत: लाभार्थी नसूनही पंतप्रधानांना असा अनुभव सांगणाऱ्या मंगेशला देशातील अडीच कोटी ‘उज्ज्वला’ लाभार्थी मातांना असाच दिलासा मिळाल्याचे समाधान वाटते. देशातील अधिकाधिक महिलांचे दु:ख या योजनेमुळे दूर होण्याची अपेक्षा तो व्यक्त करतो. मंगेश व त्याची आई देवकाबाई या मायलेकरांचे भावविश्व एका ‘गॅस जोडणीने’ परत उजळून निघाल्याची भावना पंतप्रधान मोदी मंगेशला पाठविलेल्या उत्तरातून व्यक्त करतात.

देशभरातील कोटय़वधी घरात पेटणारी चूल ही महिलांच्या आरोग्याला मारक ठरते. संपन्न  लोक स्वत: सुविधा घेऊ शकतात, पण दारिद्रय़रेषेखालील महिलांसाठी हे स्वप्नच होते. ‘उज्ज्वला’ योजनेच्या माध्यमातून हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रयत्नात आईची ममता जपणाऱ्या तुझ्यासारख्या सजग युवकाने जागरण करावे, अशी अपेक्षा ठेवत पंतप्रधान मोदी मंगेशने पाठविलेल्या काव्यपक्तीमुळे भारावल्याचे नमूद करतात.

देवळी या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारणत: २० किलोमीटर अंतरावर पिंपळगाव (लुटे) हे गाव आहे. सर्वसाधारण शेतकरी कुटुंबासारखंच त्यांचं घर. स्वयंपाकघर अजूनही कुडाचेच. प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर मंगेशने वर्धा येथील नवोदय विद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. नागपूरच्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी घेतली. सध्या तो नागपूरच्याच ‘इन्फोसेप्ट’ या कंपनीत अभियंता म्हणून काम करतो. मंगेशला सामाजिक प्रश्नावर चिंतन करण्याची सवय आहे. समाजमाध्यमावर तो व्यक्तही होतो. मोदींना पत्र पाठवताना त्याचे उत्तर येईल, याची त्याला शाश्वती नव्हती, मात्र ‘उज्ज्वल’च्या निमित्ताने मनातील भावना त्यांना कळाव्या, या हेतूने त्याने त्यांना पत्र लिहिले. त्याचे उत्तर आल्यावर खूप आनंद झाला, आईवडिलांना हे सांगितल्यावर त्यांनाही बरे वाटले, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. यापूर्वी नोटाबंदीच्या निर्णयानंतरही त्याने मोदींना पत्र पाठविले होते, ग्रामीण भागात नोटा बदलताना होणारा त्रास त्यात नमूद केला होता. पोस्ट आणि बँक यांची सांगड घालावी, अशी सूचना केली होती. या पत्रालाही मोदींचे उत्तर आले होते व भविष्यात ही योजना राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, सर्वसामान्यांच्या पत्राची किमान दखल घेणे समाधानाची बाब आहे, असे मंगेश सांगतो.

मोदींचा हेतू चांगला..

लोकहितासाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या लोकहिताच्या योजनांचा हेतू चांगला आहे, पण  त्यांच्याच ‘परिवारा’तील लोकांचा त्यांना त्रास होतो, असे मंगेश ‘गोहत्या’ संदर्भातील निर्णयावर म्हणाला. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ करण्याची मोदींची घोषणा फक्त घोषणा ठरू नये, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.

मंगेशची आई म्हणते, घरी गॅसजोडणी आल्यावर मंगेशलाच खूप आनंद झाला होता. वडिलांच्या मागे लागून ही सुविधा त्याने आणली होती. वडील संतोष रायमल म्हणतात, त्या वेळी चुलीशिवाय पर्याय नव्हता. मंगेशची आई धुरामुळे सतत खोकायची. दम्याची लक्षणे दिसू लागली होती. दीड वर्षांपूर्वीच चुलीचा त्रास संपला. मी माझ्या आईचे दु:ख संपवू शकलो नाही, पण माझ्या मुलाने मात्र त्याच्या आईचे कष्ट संपविले. त्याच भावना त्याने पंतप्रधानांना कळविल्या. आता ती आल्यागेल्याला चहाशिवाय पाठवीत नाही.

पंतप्रधानांना भावलेली मंगेशची कविता

बच्चों को खेलने के लिए,

तुने कभी आंखों की परवाह नहीं की..

धुएं के समंदर में भी, रसोई की कश्ती तुने कभी डगमगाने न दी

धुए से हुई लाल आंखों से, टपकते आंसूओं को मैने देखा हैं..

बच्चों को खाने में देर न हो बस इसलिए उसको पोछने की भी हरकत ना की..

गिली लकडियों से भी तुझे, चुल्हा जलाते मैने देखा हें,

फुंक फुंककर सांस फूल जाती मगर, सांस लेने की भी तुने जरुरत न समझी..

शुक्र है ‘उजाला’ का, तेरी तकलिफे तो दूर होगी,

बेहतर भविष्य की तरफ एक उडमन होगी..