चौथीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी येथील स्थानिक न्यायालायने मंगळवारी शिक्षक आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पांडुरंग शामराव सुतार असे या आरोपीचे नाव आहे.

पारधेवाडी (ता. भूदरगड) येथील शाळेत १० वर्षाची मुलगी शिकत होती. १२ जुलै २०११ रोजी शिक्षक सुतार याने तिला झाडलोट करण्याच्या बाहण्याने बोलवून अत्याचार केला होता. हा प्रकार तिने घरी सांगू नये म्हणून सुतारने तिला दोन रुपये खाऊसाठी दिले. त्या मुलीस त्रास होऊ लागल्याने तिने सायंकाळी कामावरून परत आलेल्या आई-वडिलांना घडलेला हा प्रकार सांगितला. त्यानुसार त्यांनी भूदरगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तत्कालीन पोलीस निरीक्षक आर. बी. शेडे यांनी तपास करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या खटल्यात ९ साक्षीदार तपासले. फिर्यादी व इतर साक्षीदारांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. सरकारी वकील सुजाता इंगळे यांचा युक्तीवाद व पुरावे ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यु. कदम यांनी आरोपी पांडुरंग सुतार याला जन्मठेप, १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.