करोना विषाणू महामारीविरोधात स्वरचित गीतांद्वारे जनप्रबोधन करणाऱ्या सोलापुरातील एका गायक कलावंताचा अखेर करोनानेच बळी घेतल्याची घटना समोर आहे.

पुंडलिक दोमल (वय ६६, रा. माधवनगर, सोलापूर आकाशवाणी केंद्राजवळ, सोलापूर) असे करोनाचा दुर्दैवी बळी ठरलेल्या गायक कलावंताचे नाव आहे. दोमल हे एका यंत्रमाग कारखान्यात मुनीम म्हणून नोकरी करीत होते. ते हौशी तेलुगु कवी आणि गायक होते. विणकर पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय ऋषींचे चरित्रगान दोमल यांनी लिहिले आणि स्वतः स्वरबध्द केले होते. संपूर्ण तेलुगु विश्वात या रचनांनी लोकप्रियता प्राप्त केलेली आहे.

सोलापुरात करोना विषाणूचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असल्याने, त्याची मोठी झळ शहरातील तेलुगू भाषिक समाजाला बसली आहे. करोनाच्या वाट्याला आलेल्या टाळेबंदीत तर सारे अर्थचक्रच ठप्प झाल्यामुळे गोरगरीब, कष्टकरी वर्गाचे हाल झाले आहेत. औषधोपचाराविना अनेकांना प्राण सोडावे लागले. मृत्यूमुखी पडलेल्या स्वतःच्या आई-वडिलांच्या अंत्यविधीला परगावहून येऊ न शकणारी मुले, करोनाने मृत्यू झालेल्या दुर्दैवी व्यक्तींवर नातेवाईकांविनाच बेवारसासारखे तिरडी आणि पुष्पहाराशिवाय अंत्यविधी होणे, अशा प्रसंगाने व्यथित झालेल्या पुंडलिक दोमल यांनी करोनाविरोधात जनप्रबोधनपर तेलुगूतून गीतरचना केल्या आणि त्या स्वतः स्वरबध्द करून समाज माध्यमातून प्रसारीत देखील केल्या.

या गीतरचना लोकप्रिय होत असतानाच अलिकडे स्वतः दोमल हे ताप आणि न्यूमोनियाने आजारी पडले होते. त्यांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. एका खासगी रूग्णालयात उपचार घेताना अखेर त्यांचा मृत्यू झाला. दुर्दैवाचा फेरा असा की, मृत्यू झाल्यानंतर तब्बल चार दिवस उशिरा त्यांचा अंत्यविधी झाला. कारण विद्युतदाहिनी उपलब्ध होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली.