दिल्लीत संविधानाची प्रत जाळल्याच्या घटनेवर आक्षेपार्ह टिप्पणी करून त्याला अंगठा (लाईक इमोजी) दाखूवन सहमती दर्शविणार्‍या चार तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील या चार तरुणांवर उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

उमरगा तालुक्यातील त्रिकोळी येथील काही तरुणांनी ‘त्रिकोळीकर’ नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर संपत बिराजदार याने रविवारी सकाळी संविधान जाळण्यात आल्याच्या विषयावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यास केदार बाळू जाधव, किसन माधव कुन्हाळे यांनी अंगठा दाखवत सहमती दर्शविली. तर धीरज हासुरे यानेही बिराजदार याच्या पोस्टचे समर्थन करीत टाळी वाजविल्याची इमोजी पोस्ट केले. हे चॅटिंग निदर्शनास आल्यानंतर त्रिकोळी येथीलच शशिकांत नागनाथ सुरवसे या तरुणाने रविवारी रात्री उमरगा ठाणे गाठून चारही जणांविरुद्ध तक्रार दिली. या प्रकाराची शहानिशा करुन पोलिस निरीक्षक माधव गुंडिले यांच्या सुचनेनुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी संपत बिराजदार व केदार जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

राष्ट्राभिमानाच्या प्रतिकांचा अवमाऩ

प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर अ‍ॅक्ट १९७१ या कायद्यात राष्ट्राभिमानाच्या प्रतिकांचा अवमान करण्याबद्दलच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रध्वज व संविधान ही राष्ट्राभिमानाची प्रतिके आहेत. याशिवाय, राष्ट्रगीत गातानाही कोणी अडथळा आणत असेल वा रोखत असेल तर त्यालाही शिक्षा होऊ शकते, अशी तरतूद कायद्यात आहे. या तरतुदीनुसार आरोपीस तीन वर्षांपर्यंत कैद किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा करता येऊ शकतात. असाच गुन्हा संबंधित आरोपींनी दुसर्‍यांदा केल्यास कैदेची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे, जी एक वर्षापेक्षा कमी नसेल.