-दत्तात्रय भरोदे
आसनगाव स्थानकावर दक्ष असलेल्या पॉइंटमनला मालगाडीच्या डब्याचे चाक जाम झाल्याचे लक्षात येताच मालगाडी आटगाव स्थानकावर थांबविण्यात आल्याने, डाउन मार्गावरील  वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली. दक्ष पॉइंटमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान, यामुळे एक कसारा लोकल रद्द देखील करण्यात आली. तर लांबपल्ल्याच्या एक्सप्रेसचाही खोळंबा झाला. तर, सकाळी लगबग असलेल्या चाकरमानी प्रवाशांना मात्र नेहमीप्रमाणे त्रास सहन करावा लागला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज(मंगळवार) सकाळी सहा वाजेच्या सुमारास मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकावरून जाणाऱ्या मालगाडीच्या तिसाव्या डब्याचे चाक लालबुंद झाल्याचे, पॉइंटमन शाम सखाराम यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याबाबत आसनगाव स्टेशन मास्तरला सांगितल्यानंतर त्यांनी आटगाव स्टेशन मास्तरशी संपर्क साधला व मालगाडी आटगाव स्थानकात थांबविण्यात आली. मालगाडीचे चाक जाम झाल्यामुळे लालबुंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर मालगाडीचा चाक जाम झालेला तिसाव्वा डबा मालगाडीपासून वेगळा करण्यात आला.

तब्बल दीड तासानंतर साडेसात वाजेच्या सुमारास वाहतूक सुरू झाली. यामुळे कसाऱ्याला जाणारी ६:१९ ची लोकल रद्द करून, आसनगाव येथून सीएसटीकडे रवाना करण्यात आली. तर तुलसी एक्सप्रेस, गीतांजली एक्सप्रेस व काशी एक्सप्रेस या लांबपल्ल्याच्या गाड्यांचाही यामुळे खोळंबा झाला. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड होण्याच्या घटना वारंवार होत असल्याने, या गाड्यांची वेळोवेळी दुरुस्ती होते की नाही? याबाबत चाकरमानी प्रवाशांकडून प्रश्न विचारला जात आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असून, रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहावे अशी मागणी संतप्त प्रवाशांकडून केली जात आहे.