उत्तरा नक्षत्राच्या पावसाने दोन दिवसांपूर्वी बिलोली-देगलूर तालुक्यांच्या अनेक भागांत थैमान घातल्यानंतर या पावसाचा तडाखा मुखेड तालुक्यातील अनेक गावांना बसला. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात मनुष्यहानी झाली नसली, तरी पिकांसह पशूधन नष्ट झाले. मुखेड तालुक्यात मौजे सकनूर येथे पावसाने सुमारे 1 हजार कोंबड्यांचा बळी घेतला.

पावसाळा शेवटच्या टप्प्यात आलेला असताना, रविवारी रात्रीनंतर जिल्हाभर सुरू झालेल्या पावसाने बिलोली-देगलूर-नायगाव या पट्ट्यातील अनेक गावांची वाताहात केली. त्यानंतर या पावसाने मुखेड तालुक्यात अनेक गावांमध्ये दाणादाण उडवून दिली. मुखेड तालुक्यातील मुखेड, मुक्रमाबाद, चांडोळा आणि बार्‍हाळी इत्यादी मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. जुन्ना व दबडे शिरूर येथील तलाव पूर्वीच भरलेले होते. त्यातच मुसळधार पाऊस पडल्यामुळे मोती नदीला आलेल्या पुराचा फटका मुखेड शहरातील अनेक भागांना बसला.

onion, Dindori, loksabha election 2024,
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी
onion, Dindori, loksabha election 2024,
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार

मुखेडच्या नवी आबादी भागातील झोपडपट्टीत प्रचंड पाणी घुसल्यामुळे सुमारे 700 कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले. मोती नदीजवळच असलेल्या स्मशानभूमीच्या भिंती कोसळल्यामुळे तेथेही पाणी शिरले. पावसासोबतच काही भागात वीज कोसळल्यामुळे तालुक्यातील इटग्याळ प.दे. येथे पशूंचाही मृत्यू झाला. तर कलंबर येथे जनावरांच्या गोठ्यावर वीज पडून गोठा खाक झाला. मोती नदीच्या पुरात शेळ्या आणि बैल वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. बेन्नाळ येथील पाझर तलाव फुटल्यामुळे गावातील शेतजमिनी जलमय झाल्या असून वेगवेगळ्या भागात सोयाबीन व अन्य पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणच्या केळीच्या बागा, उसाचे मळे अक्षरशः आडवे झाल्याचे दिसून आले. घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली.

धामनगाव, मोटरगा, उच्चा, बेटमोगरा, होनवडज, चांडोळा, भगनूर इत्यादी अनेक गावांमध्ये पावसाने थैमान घातले. बुधवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आ.तुषार राठोड यांनी तहसीलदारांसह मुखेडच्या वेगवेगळ्या भागात जाऊन पाहणी केली. महसूल व नगर परिषद प्रशासनास त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झाली. तालुक्यातील जामखेड व चांडोळा येथील तलाव एका रात्रीतून भरले. मन्याड नदीला आलेल्या पुराचा फटका अनेक गावांना बसला. मुखेड तालुक्यावर करोनाचे संकट अधिक गहिरे होत चालले आहे. ग्रामीण भागातील लोकं त्यामुळे भयग्रस्त झालेले असतानाच गेल्या दोन दिवसांतील पावसाने शेकडो गरीबांचे संसार उद्ध्वस्त केल्यामुळे शासन व जिल्हा प्रशासनाने त्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी आ.डॉ.तुषार राठोड यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यात 86 टक्के पाऊस

सप्टेंबरच्या पंधरवड्यातील बरेच दिवस विश्रांती घेतल्यानंतर गेल्या सोमवारपासून जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हाहाकार माजवला. जिल्ह्यातील 16 तालुक्यांपैकी मुखेड तालुक्यातील पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये 80 टक्क्यांच्या वर पाऊस झाला असून 1 ते 30 सप्टेंबर या काळात पडणार्‍या पावसाची तुलना करता जिल्ह्यात आतापर्यंत 86.44 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे.