07 August 2020

News Flash

सोलापूरवर पुन्हा जलसंकट

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणा-या टाकळी येथील भीमा नदीवरील औज बंधा-यातील पाण्याचा साठा अवघ्या दीड महिन्यातच संपुष्टात येत असल्यामुळे त्यावर वेळीच उपाय म्हणून उजनी धरणातून बंधा-यात

| May 14, 2015 03:30 am

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणा-या टाकळी येथील भीमा नदीवरील औज बंधा-यातील पाण्याचा साठा अवघ्या दीड महिन्यातच संपुष्टात येत असल्यामुळे त्यावर वेळीच उपाय म्हणून उजनी धरणातून बंधा-यात पाणी न सोडल्यास येत्या दहा दिवसांनंतर शहरावर जलसंकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. शहराला सध्या तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. परंतु जलसंकट उद्भवले तर पाणीपुरवठा आठवडय़ातून एकदा करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  
उजनी धरणातून सोलापूरसाठी थेट जलवाहिनी योजनेद्वारे दररोज ४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. तसेच विजापूर रस्त्यावरील टाकळी येथील भीमा नदीवरील टाकळी बंधा-यातूनही शहरासाठी सुमारे ३५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. हिप्परगा जलाशयातून पाणी उपसा बंद झाला आहे. औज बंधा-यातून होणा-या पाणीपुरवठय़ात सुधारणा होण्यासाठी नुकताच सोरेगाव येथे ब्रेक प्रेशर टँक (बीपीटी) कार्यान्वित केल्यामुळे १५ एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा वाढला आहे. ‘बीपीटी’मुळे शहराच्या पाणीपुरवठय़ात सुधारणा होऊन तीन ते चार दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणे शक्य आहे, असा दावा पालिका प्रशासनाने यापूर्वी केला होता. परंतु ही यंत्रणा सुरू होऊन त्यानुसार वाढीव पाणी मिळत असले, तरी पाणीपुरवठय़ाचा कालावधी कमी होण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे.
या पार्श्र्वभूमीवर औज बंधा-याजवळ पाण्याची मोठय़ा प्रमाणात गळती होत असल्यामुळे बंधा-यातील पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत आहे. यातच बीपीटी यंत्रणेमुळे जादा पाणी उचलले जात आहे. त्यामुळे बंधा-यातील पाणीसाठा घटत चालला आहे. येत्या दहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा बंधा-यात शिल्लक राहिला आहे. गेल्या १ एप्रिल रोजी उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठय़ासाठी टाकळी-औज बंधा-यात उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. परंतु अवघ्या दीड महिन्यातच पाणीसाठा संपुष्टात आल्याची उद्भवल्यामुळे पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. उजनी धरणातून पुन्हा पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाला पालिका प्रशासनाकडून पत्र सादर करण्यात आले असून आमदार प्रणिती शिंदे यांनीही यात लक्ष घालून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला आहे. तर इकडे उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी केवळ दीड महिन्यात पाणीसाठा संपत आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत त्याचे खापर सोलापूर महापालिकेवर फोडले आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2015 3:30 am

Web Title: the water crisis again on solapur
टॅग Solapur
Next Stories
1 नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस
2 स्वकियांवर तोफ डागणाऱ्या कदमांना ‘राष्ट्रीय’ बढती
3 रोजगाराच्या नावाखाली युवकांची लुबाडणूक
Just Now!
X