लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याचा रंग गत काही दिवसांमध्ये बदलला आहे. सरोवरातील पाण्याचा रंग लाल दिसू लागल्याने नागरिकांमधील कुतूहल वाढले. पाण्याचा रंग बदलण्यामागील कारण अद्यााप अस्पष्ट आहे. यावर संशोधनाची गरज अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगातील आश्चार्य म्हणून ओळखले जाते. हे जागतिक दर्जाचे बेसॉल्ट खडकापासून बनलेले एकमेव सरोवर आहे. या खाऱ्या पाण्याच्या सरोवर परिसरात असलेल्या मातीमध्ये चुंबकीय गुणधर्म आहेत. या सरोवराचा अभ्यास करण्यासाठी जगाच्या विविध भागातून संशोधक नेहमी येतात. करोना विषाणूचा प्रादुर्भाव व टाळेबंदीमुळे मागील तीन महिन्यात लोणार सरोवर परिसरात कोणीही अभ्यासक फिरकलेले नाहीत.
जागतिक तापमानवाढ व पर्यावरणातील बदलाचे परिणाम लोणार सरोवरावर होत असल्याची चर्चा अभ्यासकांमध्ये नेहमी असते. गेल्या आठवड्यात मोसमाच्या आधीचा पाऊस पडला. निळे व हिरवे दिसणारे सरोवरातील पाणी दोन दिवसांपासून लाल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून आश्चार्य व्यक्त होत आहे. नागरिकांनी याचे छायाचित्र व चित्रफित काढून समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल केली. पाण्याचा बदलेला रंग पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. रंग बदल्यामागील नेमके कारण अद्यााप समोर आले नाही. लोणार सरोवरात हॅलोबॅक्टेरिया आणि ड्युनोलिला सलीना नावाच्या कवका बुरशीची खाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाल्यामुळे पाण्याचा रंग लाल झाला असावा, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वातावरणातील बदल, सरोवरात पाण्याची कमी झालेली पातळी, या प्रकारातूनही रंग बदलल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. विविध घटक पाण्यामध्ये आहेत. सरोवरातील पाण्यात झालेले बदल अभ्यासले जाणार असून, संशोधन करणाऱ्या संस्थांकडे पाण्याचे नमुने पाठविण्यात येणार आहेत. त्यावर संशोधन झाल्यावर अधिकृत निष्कर्ष काढता येईल, अशी माहिती लोणार सरोवर विकास व संवर्धन समितीचे सदस्य प्रा.गजानन खरात यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 8:46 pm