रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा व आरोग्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसत आहे.

”राज्यपाल कोश्यारी यांनी अर्णब गोस्वामीच्या सुरक्षेविषयी ज्या प्रकारे चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी नाईक कुटुंबाची काळजी करावी, ज्यांनी कुटुंबातील दोन सदस्य गमवले आहेत. आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या अर्णबची चिंता करण्यापेक्षा राज्यपालांनी नाईक कुटुंबाची अधिक काळजी करायला हवी.” असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सध्या अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तुरूंगात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृती व सुरक्षेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिंता व्यक्त केली आहे.अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलू देण्याची अनुमती द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केलेली आहे.