मागील अनेक वर्षांपासून उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींची मागणी आहे. त्याची पूर्तता आता लवकरच होणार आहे. येत्या पंधरवड्यात राज्याच्या मंत्रिमंडळात उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली जाईल. त्यांनतर योग्य त्या तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याबरोबर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रत्यक्ष उभारणीस सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते उस्मानाबादेत आले होते. आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग आता सुकर झाला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा कांबळे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कोलते आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील करोनाची स्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. आणखी किती काळ या परिस्थितीशी लढा द्यावा लागेल हे माहीत नाही. मात्र परिणामकारक औषध अथवा लस जोवर येत नाही तोवर खबरदारी बाळगायलाच हवी. राज्य सरकार त्यादृष्टीने सर्वतोपरी काळजी घेत आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक करोनाच्या तपासण्या महाराष्ट्रात होत आहेत. प्रसंगी खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सेवादेखील वर्ग केल्या जातील. त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर सर्व अधिकार बहाल करण्यात आले असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच राज्यातील रिक्त जागांची भरती करण्यासाठी देखील प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लवकरच 25 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. राज्यातील सरकारी रुग्णालयात  आवश्यक त्या उपकरणांची उपलब्धता करवून देण्यात आली आहे. कोठेही निधींची कमतरता पडणार नाही. जिल्हा नियोजन समितीमधील 25 टक्के निधी करोनाच्या लढ्यासाठी उपयोगात आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांना तसे अधिकार दिले असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

आता उस्मानाबाद येथेच करोनाची तपासणी –
राज्यात यापूर्वी केवळ विषाणू तपासणी करणाऱ्या दोन प्रयोगशाळा होत्या. करोनामुळे उदभवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी मोठया प्रमाणात प्रयोगशाळाची उभारणी करण्यात आली. राज्यात सध्या 108 ठिकाणी विषाणूजन्य आजारांची तपासणी करणाऱ्या अद्ययावत प्रयोगशाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. उस्मानाबाद येथील प्रयोगशाळेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही दिवसातच आता उस्मानाबाद येथेच करोनाच्या तपासणी केल्या जातील, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी दिली.