बॉलिवूडने जगात देशाचं नाव उंचावलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडसोबत आहे, असं मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. ट्विट करुन देशमुख यांनी आपली भूमिका मांडताना बॉलिवूड कलाकारांवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं.

देशमुख म्हणाले, “केवळ काही लोकांच्या ड्रग्ज घेण्यामुळे संपूर्ण बॉलिवूडचं नाव खराब करणं चुकीचं आहे. जे कोणी ड्रग्ज प्रकरणात सामिल आहेत त्यांच्यावर कारवाई पण होत आहे. मात्र, बॉलिवूडने जगभरात देशाचं नाव उंचावलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे.”

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज अँगलवर तपास यंत्रणांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे. यावरुन सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीसह बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिका जसे दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांचीही नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं (एनसीबी) चौकशी केली आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हीने वारंवार बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांचा मुद्दा उचलून धरला असून यावरुन ती सातत्याने बॉलिवूडवर निशाणा साधत आहे. सुशांतसिंह प्रकरणावरुन तीने मुंबई पोलीस आणि महाविकास आघाडी सरकारलाही टार्गेट केले आहे.