मोबाइलवर अश्लील संदेश पाठवून शरीरसंबंधाची मागणी करणार्‍या अधिकार्‍याच्या विरोधात तक्रार देणार्‍या पीडित शिक्षिकेला पोलिसांनी तब्बल १८ तास आरोपीप्रमाणे वागणूक दिल्याचा संतापजनक प्रकार उस्मानाबादमध्ये समोर आला आहे. प्रकरणाची सर्वत्र वाच्यता झाल्यानंतर आपली लाज राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने शिक्षणाधिकारी असलेल्या आरोपीविरोधात अखेर सहा दिवसांनी गुन्हा नोंद केला आहे.

जिल्हा परिषदेतील कंत्राटी शिक्षिकेला प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप मागील चार महिन्यांपासून अश्लील संदेश पाठवून शरीरसंबंधाची मागणी करत होते. वेळी-अवेळी कार्यालयीन कामकाजाच्या बहाण्याने घरी बोलावणे, बाहेगावी फिरावयास जाण्यासाठी दबाव आणणे अशा ना-ना क्लृप्त्या लढवून या शिक्षिकेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. याविरोधात पीडित शिक्षिका १० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. सकाळी ११ ते दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत फिर्यादी शिक्षिकेला पोलिसांनी ठाण्यातच बसवून ठेवले. दरम्यान, आरोपी मात्र पोलीस अधिकार्‍याशी त्याच्या खोलीत गप्पा मारत बसला होता. पोलिसांकडून मिळालेली ही वागणूक सहन न झाल्याने पहाटे तीनच्या सुमारास पीडित शिक्षिकेने हेल्पलाइनला फोन करून आपला अनुभव सांगितला. हेल्पलाइनला फोन केल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील पोलीस अधिकारी घात यांचा पारा चांगलाच चढला.

त्याचवेळी आरोपीच्यावतीने दोन अज्ञात व्यक्तींनी पोलीस ठाण्यात येऊन पीडितेला तक्रार दाखल न करण्यासाठी ५ लाख रूपयांचे आमिष दाखविले. हा सगळा प्रकार पोलीस अधिकार्‍यांच्या समक्ष सुरू होता, हे विशेष. आमिष दाखविणार्‍या ‘त्या’ दोघांना साधी विचारणा देखील केली नाही. सध्या या पीडितेवर दबाव आणण्यासाठी आरोपी जगताप  विविध प्रकारचे उपाय योजताना दिसतो आहे.  त्यात पोलिसांनी दिलेल्या वागणुकीमुळे पीडित महिला पूर्णतः खचून गेली आहे. प्रकाराची वाच्यता सगळीकडे झाल्यानंतर अखेर या आंबटशौकीन शिक्षणाधिकार्‍याविरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई: पोलीस अधीक्षक

तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या पीडित महिलेला १८ तास पोलीस ठाण्यात थांबवून घेतले असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे. असा प्रकार घडला असल्यास त्याला जबाबदार असणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची गय केली जाणार नाही. आपण व्यक्तिशः या सर्व कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवून योग्य ती कायदेशीर कारवाई करू, असे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.