मुंबईहून परतलेल्या वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील महिलेला करोनाची लागण झाली आहे. त्या महिलेचा करोना तपासणी अहवाल मुंबई येथेच सकारात्मक आला. मूळ मालेगाव तालुक्यातील व कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील महिलेला करोना संसर्गाची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे या कुटुंबाने स्वत:हून मुंबई येथील खासगी वैद्याकीय प्रयोगशाळेत महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी दिले.

या तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच हे कुटुंब मुंबई येथून वाशिमकडे रवाना झाले. मात्र, वाशीम जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच त्या महिलेचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आल्याचे कळले. त्यामुळे हे कुटुंब थेट वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यांचा वाशीम जिल्ह्याात इतर कोणाशी संपर्क आलेला नाही. करोनाबाधित महिलेसोबत मुंबई येथून आलेल्या इतर व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

११ अहवाल अप्राप्त
वाशिम गृह विलगीकरणात ५१ जण असून, संस्थात्मक विलगीकरण १७ जणांना दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील अलगीकरण कक्षात १२ जण दाखल आहेत. आतापर्यंत १०८ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यातील ३ सकारात्मक आले असून, दोघांना सुटी, तर एकाचा मृत्यू झाला आहे. आणखी ११ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत.