काही अज्ञात आर्थिक कारणांमुळे उस्मानाबादच्या ऑक्सीजन सिलेंडरच्या टँकचे काम मागील वर्षभरापासून रखडले आहे. सध्या उपचाराधीन असलेल्या रुग्णांसाठी दररोज तासाला ३३ सिलेंडरची गरज भासत आहे आणि तामलवाडी येथील ऑक्सिजन भरून देणाऱ्या केंद्राची क्षमता तासाला ४० सिलेंडरची आहे. पुरवठा आणि मागणीची सध्या कसरत सुरू आहे. आगामी दोन दिवसांत गतवर्षीपासून रखडलेल्या ऑक्सिजन सिलेंडरच्या टँकचे काम पूर्ण झाले नाही तर आरोग्य यंत्रणेला व्यवस्थापन करणे जड जाणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथील ऑक्सिजन भरून देणार्‍या केंद्रालाच होत असलेला पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. पूर्वी दररोज दहा टन द्रव रूपातील ऑक्सिजन प्राप्त होत होता. तो आता पाच टनांवर आला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण येथून नऊ तासांत द्रव रूपातील ऑक्सिजन तामलवाडीत पोहोचतो. दोन तासांत मोठ्या सिलेंडरमध्ये भरून ४५ मिनिटांचा प्रवास करून तो रुग्णालयांपर्यंत पोहोचतो. मात्र रिकामे सिलिंडर परत या केंद्रावर जाण्यासाठी सहा तासांहून अधिक वेळ लागत आहे. व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे रिकामे सिलिंडर उपलब्ध होत नाहीत. परिणामी जलदगतीने ऑक्सिजन सिलिंडरचा पुढचा टप्पा प्राप्त होण्यास विलंब होत आहे. पुढील काही दिवसांत रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होईल, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. परिणामी ऑक्सिजनचा तुटवडा रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे.

रिकामे सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे खोळंबा –
महाराष्ट्रात चाकण, रायगड, नागपूर आणि मुंबई या चार ठिकाणी द्रव स्वरूपातील ऑक्सिजन तयार करण्याचे कारखाने आहेत. चाकण येथील आयनॉक्स या कारखान्यात प्रतिदिवस १९० टन द्रव स्वरूपातील ऑक्सिजन निर्माण केला जातो. सलग नऊ तास प्रवास करून ऑक्सिजनचे टँकर तामलवाडी येथील केंद्रावर पोहोचतात. मागील वर्षी एप्रिलपूर्वी दर २४ तासाला १० टन द्रव स्वरूपातील ऑक्सिजनचे रूपांतर वायू स्वरूपात केले जात होते. एप्रिलपासून हे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले आहे. १५० किलोग्रॅम वजनाच्या एका सिलिंडरमध्ये ऑक्सिजन रूपांतरित करण्यासाठी साधारणतः सव्वा मिनिटाचा कालावधी लागतो. एका गाडीतून ९० सिलिंडरची वाहतूक सध्या केली जात आहे. ९० सिलिंडर भरण्यासाठी दोन तासांचा अवधी लागतो. सध्या उस्मानाबाद येथील सरकारी रुग्णालयासाठी २५० आणि खासगी रुग्णालयासाठी १५०, असे ४०० मोठे सिलिंडर तामलवाडी येथून भरून पाठविले जातात. एकावेळी ३२ सिलेंडर भरता येतील, अशा दोन ओळी आहेत. म्हणजे ६४ सिलेंडर एकावेळी भरण्याची प्रक्रिया सुरू असते. सलग २४ तास हे काम सुरू आहे. लातूर येथील विजय गिल्डा यांचे हे केंद्र आहे. रात्रंदिवस पाच मजूर, पाच चालक, तीन कार्यालयीन कर्मचारी आणि एक सुरक्षारक्षक हे काम करीत आहेत. दोन तासांत सिलिंडर भरणे, ४५ मिनिटांचा प्रवास, अशा अवघ्या पावणेतीन तासात सर्व प्रक्रिया करून ऑक्सिजन सिलिंडर उस्मानाबाद शहरात दररोज पोहोचविले जातात. रिकामे झालेले हेच सिलिंडर या केंद्रावर परत करण्यासाठी मात्र आरोग्य यंत्रणेला त्यापेक्षा अधिक अवधी लागत आहे. रिकामे सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे देखील पुढील सर्व प्रक्रियेचा खोळंबा होत आहे.

वर्षभरानंतर पुन्हा तोच तुटवड्याचा प्रश्न निर्माण –
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडर टँकचे काम रखडल्यामुळे वर्षभरानंतर पुन्हा तोच तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकदाराशी असलेल्या आर्थिक हितसंबंधामुळेच हे काम मागील वर्षभरापासून रखडले असल्याची चर्चा आरोग्य विभागातील अधिकारी दबक्या सुरात करीत आहेत. पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण न झाल्यास मागणी आणि पुरवठा याचा मेळ तुटण्याची शक्यता आहे. त्याची किंमत सामान्य रुग्णाच्या जीवावर बेतू नये अशी मागणी आता पुढे येत आहे.