वडिलांसोबत दारू का पितोस? हे विचारणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातील येथील दाबका या ठिकाणी घडली आहे. खळबळ माजली आहे. रात्री १२.३० ते १ च्या दरम्यान ही घटना घडली आहे. दाबका येथील राम पवार हा गावातल्याच शौकत पटेल यांच्या ट्रकवर चालक म्हणून काम करतो. आठ दिवसांपूर्वी राम पवार आणि दुसरा चालक महेताब इस्माइल फकिर याला आंध्र प्रदेशमध्ये नेले होते. तिथून परतल्यावर महेताब दाबका या ठिकाणी उतरला. रामने महेताबला १ हजार रुपये दिले. या ठिकाणी दोघांनी एका बाटलीतील अर्धी-अर्धी दारूही प्यायली.

महेताब याने वडिल राम यांच्यासोबत दारु प्यायली ही माहिती रामचा मुलगा अभिजित पवारला समजली. अभिजितने महेताबला जाब विचारला की तू माझ्या वडिलांसोबत दारु का प्यायलास? याचा राग महेताबच्या मनात होता. २१ एप्रिलला राम पवार दाबका येथे आला असता महेताबने त्याला तू इंदापूर गाव ओलांडून दाखव अशी धमकी दिली. रामने त्याकडे दुर्लक्ष केले. रविवारी दुपारी तो ट्रक घेऊन इंदापूरकडे निघाला.

दरम्यान दाबका गावात रविवारी रात्री तुकाराम जमादार यांच्या घरी कार्यक्रम होता. त्यामुळे अभिजित आणि त्याचा मित्र इरफान गैबीशा फकीर हे दोघेही जेवणासाठी गेले होते. जेवण करून शेतात झोपायला गेलेल्या अभिजितला महेताब, मेहबुब इस्माइल फकीर आणि मकसूद या तिघांनी गाठले. तिथे अभिजितच्या गळ्यावर आणि छातीवर वार करुन त्याची हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात अभिजितला पडलेला पाहून इरफान घाबरला त्याने रात्री एकच्या सुमारास अभिजितच्या घरी सगळा प्रकार सांगितला.

गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना कळविले. पोलीस निरीक्षक माधव गुंडिले, पोलिस उपनिरीक्षक दिनेश जाधव यांनी घटेचा पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत खांडवी यांनी घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली. राम पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून  पोलिसांनी महेबूब ईस्माईल फकीर, मकसुद महेमुखाँ पटेल या दोघांना अटक केली आहे. तर महेताब हा फरार झाला आहे.

दाबका गावात तणाव

किरकोळ   कारणावरून झालेल्या खुनाच्या प्रकाराने अख्खे दाबका गाव सुन्न झाले आहे. खून करून फरार झालेल्या महेताबला अटक केल्याशिवाय रूग्णालयातून मृतदेह हलविणार नाही अशी भूमिका पवार यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अभिजित याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.