X

केअरटेकरकडून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार, मुलांचा वसतीगृहात पुन्हा परतण्यास नकार

नवी मुंबई येथील वसतीगृहातील तीन केअरटेकरवर अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे

नवी मुंबई येथील वसतीगृहातील तीन केअरटेकरवर अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कळंबोली येथे हे वसतीगृह आहे. ११, १२ आणि १७ वर्षाच्या तीन मुलांसोबत हा लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. कळंबोली पोलिसांनी सोमवारी रात्री दोन केअरटेकरना अटक केली आहे. तिसरा केअरटेकर उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या घरी गेला होता, तो अद्याप परतलेला नाही.

मुलांच्या आई-वडिलांचा नालासोपाऱ्यात फुलांचा व्यवसाय असून इतक्या सगळ्यांचं पोट भरणं त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी तिन्ही मुलांना जे चुलत भाऊ आहेत त्यांना कळंबोलीमधील वसतीगृहात पाठवलं. विक्रोळीमधील एक धर्मादाय ट्रस्ट हे वसतीगृह चालवतं. वसतीगृहात फक्त मुलांच्या राहण्याची सोय केली जात नसून त्यांचा शिक्षणाचाही खर्च केला जातो. पीडित मुलं कळंबोलीमधील एका खासगी शाळेत शिकत होती. यामधील १७ वर्षीय मुलाला ऐकण्याचा त्रास आहे.

मुलं सुट्टीसाठी घरी परतल्यानंतर आश्रमात पुन्हा परत जाण्यास नकार देऊ लागल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ‘जेव्हा त्यांच्या पालकांनी आश्रमात पुन्हा का जाणार नाही अशी विचारणा केली तेव्हा मुलांनी फेब्रुवारी महिन्यापासून केअरटेकर आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत असल्याचं सांगितलं’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी दिली आहे.

वसतीगृहाने मात्र आरोप फेटाळून लावले असून मुलांना पुन्हा परत यायचं नसल्या कारणाने कारणं देत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सहाय्यक आयुक्त (पनवेल विभाग) प्रकाश निलेवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘२२ पैकी फक्त तीन मुलांनी केअरटेकने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला असून तपास सुरु आहे’.

मुलांना वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आलं असून त्याचदिवशी एफआयआर दाखल करण्यात आला. वैद्यकीय चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.