शहरातील कापडबाजारात गेल्या आठवडय़ात झालेल्या चोऱ्यांमागील टोळी उघड झाली असून त्यातील एकास कोतवाली पोलिसांनी आज अटक केली. या टोळीतील एक आरोपी चोरी करताना पडून जखमी झाल्याचे व तो पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजले, मात्र या माहितीबाबत पोलीस खातरजमा करत आहेत. कापड बाजारातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते, प्रत्यक्षात मात्र चोरी करणारी टोळी पाच जणांची आहे.
चाँद सलीम शेख (वय २२, रा. सर्जेपुरा, कौलारु कँप) याला अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिल्याचे तपासी अधिकारी सहायक निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले. न्यायालयाने त्याला दि. १५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश शुक्रवारी दिला. टोळीतील सद्दाम नावाचा चोरटा चोरी करताना, वरील मजल्यावर चढताना पाईपवरून पडून जखमी झाल्याचे व तो पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचे चाँदने सांगितले असले तरी पोलीस त्याबाबत खातरजमा करत आहेत.
गेल्या आठवडय़ात, दि. २ रोजी कापडबाजारातील सलग, एकाच रांगेतील, शेजारी असलेली ८ दुकाने चोरटय़ांनी फोडली. कापड बाजारात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, मात्र चोरटय़ांनी मागील बाजूने प्रवेश केला. त्यामुळे केवळ दोनच चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. प्रत्यक्षात मात्र ही टोळी पाच जणांची आहे. त्यांची नावेही पोलिसांना निष्पन्न झाली. अधिक तपास निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जाधव, हवालदार हेमंत खंडागळे, सुनिल चव्हाण, संजय डाळींबकर, दीपक गाडीलकर आदी करत आहेत.