माका (नेवासे) व राहुरी येथील दोन वेगवेगळ्या बँकांच्या ‘एटीएम’ यंत्रातून एकाच पद्धतीने, एकाच दिवशी चोरी करुन २१ लाख ६१ हजार रुपयांची रोकड पळवण्यात आली. एटीएम यंत्रात रोकड भरणा करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये हात असल्याचा संशय आहे. संबंधित पोलिसांनी ठेकेदार कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विजयकुमार अंबादास पोटे (शिरसगाव, नेवासे) व गौरव मुनोत (ताहराबाद, केडगाव, नगर) या दोघांविरुद्ध सोनई व राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माका येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममधून २ लाख ७६ हजार ९०० रुपये तर राहुरीतील नीती काँम्प्लेक्स इमारतीमध्ये असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून १८ लाख ८४ हजार ६०० रुपये चोरुन काढण्यात आले. ३१ मार्चच्या रात्री ९ ते मध्यरात्री २.१५ दरम्यान राहुरीत तर ३१ मार्चच्या रात्री १२ ते १.३० दरम्यान माकामध्ये ही चोरी झाली.
यासंदर्भात एसआयएस प्रोसीग्युर होल्डिंग्ज कंपनीचे भास्कर त्र्यंबक देशमुख (रा. भिस्तबाग रस्ता, सावेडी, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीकडे विविध बँकांच्या एटीएम यंत्रात रोकड जमा करण्याचा ठेका देण्यात आलेला आहे. पोटे हा कंपनीचा कर्मचारी असुन कंपनीने मुनोत याची गाडी रोकड वाहून नेण्यासाठी भाडय़ाने ठरवली होती. याच कामातून दोघांना एटीएमचा गोपनीय सांकेतांक माहिती झाला होता, त्याचाच वापर करुन दोघांनी एटीएममधून रोकड काढून घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही बाब नंतर उघडकीला आल्याने काल, शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.