बार्शी येथे एका वयोवृद्ध डॉक्टरचे घर फोडून चोरटय़ांनी सुमारे १६ लाखांचा ऐवज लांबवला. २७ तोळे सोन्याचे दागिने, एक लाख ८० हजारांची रोकड तसेच अन्य किमती ऐवज चोरटय़ाच्या हाती लागला. बार्शी शहर पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. गुलबाराव माणिकराव पाटील (वय ७०) हे बार्शीत कुर्डूवाडी रस्त्यावर छत्रपती कॉलनीत कुटुंबीयांसह राहतात. तेथेच त्यांचा दवाखाना आहे. रात्री बंगल्यात पाटील कुटुंबीय जेवणखाण करून झोपी गेल्यानंतर अज्ञात चोरटय़ांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूकडून वर चढून टेरेसवर प्रवेश मिळवला. टेरेसवर शेजारच्या बैठक खोलीच्या खिडकीचे गज वाकवून आत शिरकाव केल्यानंतर चोरटय़ांनी कपाट फोडले. त्यात डायमंड असलेल्या सोन्याच्या मंगळसूत्रांसह अंगठय़ा, कर्णफुले, कानातील रिंग, प्लॅटिनम व डायमंडसह सोन्याच्या अंगठय़ा यासह रोख रक्कम असे मोठे घबाड चोरटय़ांच्या हाती लागले. चोरीला गेलेला ऐवज १५ लाख ९५ हजार रुपये एवढा आहे.

दरम्यान, पहाटे पाटील हे झोपेतून जागे झाले तेव्हा बंगल्यात चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच बार्शी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. या गुन्हय़ाची उकल करण्यासाठी पोलिसांनी  श्वानपथकाची मदत घेतली. ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. शेख हेपुढील तपास करीत आहेत.

एसटीतून दागिने लंपास

विजापूर येथून सोलापूरकडे एसटी बसमधून येत असताना सोलापुरात सैफुल चौक ते जुना विजापूर नाका दरम्यान एसटी बसमध्ये एका प्रवाशाची एक लाख ८५ हजार रुपये किमतीचा ऐवज असलेली  पिशवी चोरटय़ांनी लंपास केली. चोरी करणाऱ्या तीन-चार महिला होत्या. या संदर्भात मोहम्मद आसीफ शेख (वय ३१, रा. संजय गांधी नगर, विजापूर नाका झोपडपट्टी, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. मोहम्मद आसीफ शेख यांच्या पत्नी रुक्साना या विजापूरहून सोलापूरकडे एसटी बसमधून येत असताना बसमधील सहप्रवाशांपैकी तीन-चार महिलांनी चोरी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft of 16 lakh rupees in pune
First published on: 17-09-2017 at 01:20 IST