धरणात पाणी नसल्याने मी लघुशंका करू काय? असे म्हणणारे त्यावेळी पश्चात्तापासाठी कराडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीशेजारी बसले होते. पण, तेथे बसायची यांची लायकी आहे का? हे अजितदादा गल्लीदादा असून, दादा अन् बाबा त्यांच्या नावाप्रमाणे वागले नाहीत. त्यांचे भांडण महाराष्ट्राच्या हितार्थ नसून, केवळ एकमेकांचा वाटा न मिळाल्यानेच सुरू असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी केली.
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे, दिवाकर रावते, विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव, सेनेचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अजिंक्य पाटील, पाटणचे शंभूराज देसाई, सातारचे दगडूदादा सपकाळ, जिल्हा प्रमुख हर्षद कदम, संजय मोहिते यांची उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले,‘सिंचन घोटाळा दीड वर्षांपूर्वी उजेडात आला. त्यामुळे घोटाळय़ांची चौकशी लावली असती तर अजितदादांची जयललिता झाली असती. कारवाई करू म्हणणारे बाबा का थांबले? दादा, बाबांचे भांडण म्हणजे थोतांड आहे. कराड दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादीने तरूण उमेदवाराला पाठिंबा द्यायला हवा होता. पण, विलासराव पाटील-उंडाळकरांनाच पाठिंबा दिला. ते निवडून आल्यावर काँग्रेसकडेच जाणार असल्याने काँग्रेस राष्ट्रवादीचे ओझे किती दिवस व्हायचे हे जनतेने आता ठरवावे.’ पृथ्वीराजबाबा हेच मुळी दिल्लीवरून आलेले असल्याने शिवसेनेचे डॉ. अजिंक्य पाटील मुंबईवरून आल्याचा आरोप करण्याचा त्यांना अधिकार नसल्याचा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेच्या दूरचित्रवाहिनीवरील जाहिराती उद्यापासून सुरू होतील. त्यात जॅकेट घातलेले व केसांचा कोंबडा उडवत, लकवा मारलेल्या हाताने, फाईलवर सही करणारे मुख्यमंत्री तुम्हाला दिसतील. ‘नको ही लबाडं आपल्या राशीला, दादा-बाबाला पाठवूया काशीला’ अशी या जाहिरातीची अखेरची ओळ असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसच्या जाहिरातीची टर उडवताना ठाकरे म्हणाले, की जाहिरातीमध्ये सही करणाऱ्या पृथ्वीबाबांनी एकदा सही केली असेल, तीही शेवटी राजीनाम्याचीच. विदर्भ महाराष्ट्रपासून तोडायचा असल्यानेच भाजपने सेनेशी असलेली २५ वर्षांची युती तोडली असावी. पण, ती नेमकी का तोडली हे आजही ठामपणे कळले नसल्याचे ते म्हणाले.
दिवाकर रावते म्हणाले, की सेनेचे उमेदवार डॉ. अजिंक्य पाटील हे रहात असलेल्या येथील हॉटेलवर काल रात्री पोलिसांनी अचानक छापा मारून झडती घेतली. पोलिसांकडे त्याबाबतचे कोणतेही आदेश नसल्याने असा प्रकार निश्चितच खेदजनक असून, उंडाळकरकाकांनी आधीच तुम्हाला घाम फोडलाय, आता शिवसेनेच्या वाटेला येऊ नका असा इशारा त्यांनी दिला. लोकांनी माजी करण्यापूर्वीच पृथ्वीराजबाबांना अजितदादांनीच माजी करून टाकलंय. पण, काँग्रेसवाल्यांचा सत्तेचा अहंकार उतरलेला नाही. असे या प्रकारावरून दिसून येत आहे. डॉ. अजिंक्य पाटील म्हणाले, की मी मुंबईतून आलो असून, माजी मुख्यमंत्र्यांना जिरवण्यासाठी आलो आहे. कोणाची तरी मते कापण्यासाठी आलो असल्याचे आरोप आपल्यावर होत आहेत. परंतु, याचे उत्तर कराडची सुज्ञ जनता आणि शिवसैनिकच या निवडणुकीत देतील. संधी मिळाल्यास कराड दक्षिणचा कायापालट करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रास्ताविक प्रदीप भिडे यांनी केले.