काँग्रेसचे जेष्ठ नेते डी. वाय. पाटील यांना अंधारात ठेवून राष्ट्रवादीच्या पक्ष सदस्यत्वाच्या फॉर्मवर सह्या घेतल्या, हा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी फेटाळून लावला आहे. तसेच एखाद्या पत्रकाराने मांडलेल्या या मताऐवजी डी. वाय. पाटील यांच्या मुलाने हा आरोप केला असता तर हे प्रकरण गंभीर ठरले असते, असेही पवार यांनी म्हटले आहे.

पवार म्हणाले, या प्रकरणात शरद पवारांवर खेळी खेळल्याचा जो आरोप करण्यात आला आहे त्यात काहीही तथ्य नाही. काँग्रेसचे जेष्ठ नेते खा. अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत पाटील यांचा जाहिरपणे पक्षात प्रवेश झाला आहे. मुळात डी. वाय. पाटील हे जेष्ठ नेते आहेत, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आहेत, राज्यपाल राहिलेले आहेत ते खासदारही होते. त्यामुळे त्यांना अंधारात ठेवून असे उद्योग एखादा नेता किंवा पक्ष कसा करु शकेल.

डी. वाय. पाटलांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवारांची खेळी असं मत एका पत्रकाराने मांडलं आहे. अशा प्रकारे शरद पवारांवर जर त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला असता तर तो गंभीर ठरला असता. पण असे काही घडलेले नाही. लोकशाहीत पत्रकारांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रकरणी मी किंवा पक्षाने गांभीर्य दाखवण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण यावेळी अजित पवारांनी दिले.

दरम्यान, डी. वाय. पाटील यांचे पुत्र आमदार सजेत पाटील यांनी यासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच प्रतिक्रिया दिली होती. यात त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर कुठलाही आरोप केला नव्हता. तर ते म्हणाले होते की, डी. वाय. पाटील यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांच्या वयाचा व तब्येतीचा विचार करता सक्रीय राजकारणात सहभागी होणे अपेक्षित नाही. कुटूंब म्हणून आमच्या सर्वांसाठी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा निर्णय आश्चर्यकारक आहे. दादांच्या या निर्णयाची आम्हाला कल्पना नव्हती. हा निर्णय होत असताना राष्ट्रवादीने आमच्या कुटुंबातील लोकांच्या कानावर हा विषय घालणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही याचे वाईट वाटते.