लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : खासगी शिक्षण संस्थाचालकांना त्यांच्याच शाळेतून विद्यााथ्र्यांसाठी लागणारी वह्या, पुस्तके, गणवेश आदी साहित्य खरेदीची पालकांना सक्ती करता येत नाही. असे प्रकार झाल्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित संस्थाचालकांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, असे आदेश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

अकोला येथे पालकांच्या शिष्टमंडळाने बच्चू कडू यांना निवेदन देऊन संस्थाचालकांकडून होणाºया लुटीची व्यथा मांडली. यावेळी बच्चू कडू म्हणाले, शिक्षण संस्थाचालक अशाप्रकारे सक्ती करू शकत नाहीत. तसा त्यांना अधिकार नाही. आपल्या पाल्यासाठी आवश्यक शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, प्रयोगवही आदींसह इतर साहित्य हवे तेथून घेऊ शकतात.

पालकांनी संस्थाचालकांविरुद्ध संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. अशी तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील. बच्चू कडू यांनी तात्काळ शिक्षणाधिकाऱ्यांना याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही वेळोवेळी आढावा घेऊन पालकांच्या तक्रारींचे निराकरण करावे, असे निर्देश कडू यांनी दिले.