आमच्या सरकारने दबावाचे, सुडाचे राजकारण केले नाही तसं केलं असतं तर आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील निम्मे नेते त्यांच्या पक्षात दिसले नसते. या पक्षांप्रमाणे आम्ही कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना टोला लगावला. पंढरपूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते कल्याण काळे यांचा भाजपात जाहीर झाला यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गेली चार वर्षे केंद्रात आणि राज्यात आम्ही शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. एफआरपीसाठी आमच्या काळात शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली नाहीत. कारखानदारांना ८ सवलती दिल्या. कमी व्याज दराचे कर्ज उपलब्ध करून दिले, इथेनॉल संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला. मात्र, स्वत:ला ‘जाणता राजा’ म्हणून घेणाऱ्यांनी मंत्री असताना जे निर्णय घेतले नाहीत ते आम्ही साडे चार वर्षात घेतले. पवारांची टीम आता संपली असून आता आमची टीम आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे मनोरंजन आहे. त्यांचे भाषण हे पूर्णपणे काल्पनिक आणि वास्तवाशी कसलाही संबध नसलेले असते त्यामुळे जर चुकूनही काही जुळून आले तर तो योगायोग समजावा अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींवर टीका केली.

यावेळी कल्याण काळे यांनी पाण्याचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजपात प्रवेश केल्याचे जाहीर केले. माढा लोकसभेचे भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याची संधी द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले. दरम्यान, आजच्या या कार्यक्रमासाठी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातील लाखो कार्यकर्ते, शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

अकलूजच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटलांचा भाजपा प्रवेश?

माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अकलूज येथे १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजत ही सभा होणार आहे. दरम्यान, या सभेत माजी उपमुख्यमंत्री खा. विजयसिंह मोहिते-पाटील भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा सुरु आहे.