* विकासाला चालना देणारे सक्षम नेतृत्त्व हीच पुण्याची गरज
* ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ विशेष परिसंवादातील मत
शहराच्या भावी वाढीचा वेध घेत केलेले सुयोग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि सकारात्मक दृष्टिकोन या त्रिसूत्रीच्या आधारे पुणे आदर्श महानगर होऊ शकेल, असा सूर ‘पुणे आदर्श महानगर कसे बनू शकेल’ या विषयावरील विशेष परिसंवादामध्ये बुधवारी व्यक्त झाला. आदर्श महानगर होण्याची क्षमता आणि सामथ्र्य पुणे शहरामध्ये निश्चितच आहे. फक्त त्यासाठी विकासाला प्रोत्साहन देणारे सक्षम नेतृत्व हवे आहे, अशी अपेक्षा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बोलून दाखविली.
‘लोकसत्ता’ पुणे आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त ‘लाऊडस्पीकर’ अंतर्गत ‘पुणे आदर्श महानगर कसे बनू शकेल’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, प्रसिद्ध उद्योगपती आणि प्राज उद्योगसमूहाचे प्रमोद चौधरी, बांधकाम व्यावसायिक संजय देशपांडे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांचा सहभाग होता. पुण्याच्या वैशिष्टय़ांसह शहराची बलस्थाने, त्रुटी दूर करण्याची असलेली क्षमता आणि आदर्श महानगर होण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या मुद्दय़ांच्या आधारे सर्वच वक्तयांनी विषयाची मांडणी केली. ‘लोकसत्ता’ चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर, निवासी संपादक मुकुंद संगोराम व विविध क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.
दीपक शिकारपूर यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात देशाने केलेली प्रगती आणि त्यामध्ये पुण्याचे योगदान याविषयीची माहिती दिली. केंद्र आणि राज्य सरकारने सवलती दिल्या नाहीत तर, महाराष्ट्रात आणि पुण्यात येण्यास उत्सुक असलेले आयटी उद्योग अन्य राज्यांमध्ये जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. ‘मेगा सिटी’ असे म्हणताना शहर किती वाढवायचे या आपल्या हावरटपणाला आधी आळा घातला पाहिजे, अशी भूमिका डॉ. मोहन आगाशे यांनी मांडली.
किलरेस्कर, वैद्य या उद्योजकांनंतरच्या टप्प्यात आलेली टेल्को कंपनी आणि जागतिकीकरणानंतर गेल्या दोन दशकांमध्ये विस्तारलेला उद्योग ही माहिती देत प्रमोद चौधरी यांनी पुण्यामध्ये आदर्श महानगर होण्याचे सामथ्र्य असल्याचे प्रतिपादन केले. आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण यांचा समतोल साधणारे धोरण पुण्याला आदर्श महानगराकडे नेऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील २० वर्षांत होणारी वाढ लक्षात घेऊन राजकारण न आणता शहराच्या सीमा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. दोन महापालिका, तीन कॅन्टोन्मेंट बोर्ड, जिल्हा परिषद, प्राधिकरण अशा सात संस्थांऐवजी सगळ्यांचे नियंत्रण एकहाती राहिले तर, बांधकाम व्यावसायिकांसाठीचे प्रश्न सुटू शकतील, असेही त्यांनी सांगितले.
व्यापक सौंदर्यदृष्टीचा अभाव दूर करून साहित्य, कला, विज्ञान या शाखा कोषातून बाहेर पडल्यास पुणे आदर्श महानगर होऊ शकेल, असा आशावाद रवी परांजपे यांनी जागविला. ‘पुण्याने महानगर होऊ नये तर, महान नगर व्हावे’, अशी भूमिका घेत डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी शिक्षणाच्या माध्यमातून पुणे आदर्श महानगर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.