शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कवरच होण्यासंदर्भात शिवसेनेचा अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही. परंतु, असा निर्णय ज्या क्षणी होईल, त्या क्षणी स्मारक उभे राहील. त्यावेळी शिवसैनिक प्रसंगी कायदाही हाती घेतील, असा सूचक इशारा लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी येथे दिला ,नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी आयोजित सर्वपक्षीय सभेकरिता जोशी येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना स्मारकाबाबत त्यांनी मतप्रदर्शन केले. नगररचना कायद्यात अलीकडेच करण्यात आलेल्या बदलामुळे मैदानात बांधकाम करता येणार नाही. कायद्याचे उल्लंघन करून शिवाजी पार्कमध्ये स्मारक बांधता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या पाश्र्वभूमीवर जोशी यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला मराठी माणसांकडून विरोध होत असल्याबद्दल संताप व दु:ख होत असल्याचे नमूद केले. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवाजी पार्कवर व्हायला हवे, असे आपले मत आहे. स्मारकाबाबत शिवसेनेचा अधिकृत निर्णय जेव्हा होईल, तेव्हा स्मारक कोणत्याही परिस्थितीत उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.