मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अंबानी स्फोटकं प्रकरणात अटक केली. या अटकेनंतर राज्यात खळबळ उडाली. स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ अंबानींच्या घराजवळ पार्क करण्याच्या घटनेत वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणावरून अभिनेत्री कंगना रणौतने ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

शनिवारी रात्रीपर्यंत चौकशी केल्यानंतर एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली. हे वृत्त समोर आल्यानंतर भाजपाकडून सरकारवर टीका होत आहे. त्यातच आता अभिनेत्री कंगना रणौतनंही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “या प्रकरणात एक मोठं कटकारस्थान शिजत असल्याचं मला दिसतंय. शिवसेना सत्तेत आल्यानंतर या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं. त्याला परत सेवेत घेण्यात आलं. याचा जर योग्य तपास केला तर केवळ या प्रकरणातील रहस्यचं बाहेर येणार नाही, तर राज्यातील सरकार कोसळेल. त्याचवेळी माझ्यावर २०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतील असं माझं मन सांगत आहे. जय हिंद,”असं कंगनानं म्हटलं आहे.

मुकेश अंबानींच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात एनआयएने शनिवारी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली. तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशीरा एनआयएकडून अटक करण्यात आली. यानंतर एनआयएने सचिन वाझे यांनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली, असा आरोप केला. या आरोपासह इतर कलमान्वये वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात अटक करण्यात आलं होतं.