पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात शेतीमालाबाबत उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कांदा फेकून मारल्याशिवाय भाव मिळणार नाही. शेतकऱ्यांनी आता त्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन निफाड येथे रविवारी झालेल्या शेतकरी संघटनेच्या कांदा परिषदेत अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. निफाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ही कांदा परिषद झाली. या सभेत बोलताना रघुनाथदादा पाटील यांनी मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख केला. अनेक सभांमध्ये शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही एक महिन्यातच कांदा व बटाटा हे शेतीमाल जीवनावश्यक नसतानाही त्यांचा जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मध्ये समावेश करण्यात आला. निर्यातबंदी मूल्य ५०० डॉलर केल्याने कांद्याला भाव मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल. शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कांदा फेकून मारल्याशिवाय कांद्याला भाव मिळणार नाही, असे त्यांनी नमूद केले. औरंगाबाद दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कांदे फेकण्याचा इशाराही त्यांनी दिला. या परिषदेत तीन प्रमुख ठराव मांडण्यात आले. त्यात कांदा व बटाटा या पिकांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून केंद्र सरकारने हमी भाव जाहीर करावा, २०१४-१५ गाळप हंगामातील उसाला प्रतिटन ३३०० रुपये पहिला हप्ता द्यावा, शेतीमालाला वास्तव उत्पादन खर्चाइतकी आधारभूत किंमत कधीच न मिळाल्याने शेतकऱ्यांचे वीजदेयक व बँकेच्या कर्जातून मुक्तता करावी, हे ठराव संमत करण्यात आले.