राज्यातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारची मस्ती उतरविण्यासाठी वेळ पडल्यास सरकारचा पाठिंबा काढून सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा गंभीर इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कल्याणमधील सभेत दिला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरसभेमध्येच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपला गंभीर इशारा दिला. उद्धव ठाकरे यांनी सभेच्या शेवटी एकनाथ शिंदे यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेला आजपर्यंत जे काही मिळाले, ते केवळ नशिबाने मिळालेले नसून अनेक लोकांच्या आशीर्वादाने मिळाले. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपला पराभव समोर दिसू लागला आहे. त्यामुळेच त्यांच्यांकडून अशी वागणूक दिली जाते आहे. पण शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला भाजपने मंत्री केलेले नाही. शिवसेनेने त्यांना मंत्री केले आहे. त्यामुळे तुम्ही राजीनामा देण्याची घाई करू नका. वेळ पडल्यास सरकारचाच पाठिंबा काढून घेऊन त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. भाजपने आम्हाला अक्कल शिकवण्यापेक्षा दिवाळीच्या आत डाळींचे भाव खाली आणणार की नाही हे सांगावे, असाही टोला उद्धवा ठाकरे यांनी लगावला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातसुद्धा एवढी दादागिरी व दहशत नव्हती. शिवसेना नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पोलिसांकडून धमकावले जात आहे. खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. भाजपमध्ये आला नाही, तर त्रास देण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवलीत ठाण मांडले आहे. या दहशतीला कंटाळून मी मंत्रीपद व पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.