News Flash

महत्त्वाची बातमी….पिंपरी चिंचवडमध्ये करोना रुग्णांसाठी १,४०० बेड्स उपलब्ध!

व्हेंटिलेटर बेड्सचा मात्र तुटवडा असल्याची अधिकाऱ्यांकडून माहिती

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या महिन्यात करोना रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात परिस्थिती सुधारल्याचं चित्र दिसत आहे. पिंपरी चिंचवडच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १४०० ऑक्सिजनयुक्त बेड्स उपलब्ध असल्याचं चित्र आहे. मात्र, व्हेंटिलेटर बेड्सच्या बाबतीत मात्र परिस्थिती फारशी चांगली नाही.

पिंपरी चिंचवडचे आरोग्य सचिव डॉ. अनिल रॉय यांनी सांगितलं की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या कोविड केअर सेंटर, खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये मिळून एकूण १,४०४ ऑक्सिजनयुक्त बेड्स उपलब्ध आहेत. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मिळून एकूण ३,८०८ ऑक्सिजनयुक्त बेड्स आहेत. त्यापैकी २,४०४ बेड्सवर रुग्ण उपचार घेत आहेत तर १,४०४ ऑक्सिजन बेड्स अद्यापही रिक्त आहेत. दररोज बरे होणाऱ्या अथवा मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या संख्येनुसार रिक्त होणाऱ्या बेड्सची संख्या बदलत राहते.

व्हेंटिलेटर बेड्सच्या बाबतीत डॉ. रॉय यांनी सांगितलं की, सध्या व्हेंटिलेटर बेड्सची मात्र कमतरता आहे. सध्या पिंपरी चिंचवड परिसरात खासगी रुग्णालयांमध्ये केवळ १० व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये मात्र एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याचं रॉय यांनी सांगितलं.

आणखी वाचा- प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे सर्वाधिक खाटा नागपुरात

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये केवळ १०४ आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजनची सुविधा नसणारे १,३०० बेड्स रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. पिंपरी चिंचवड भागात १३५ कोविड रुग्णालये आणि २२ कोविड केअर सेंटर्स आहेत.

पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आरोग्य प्रमुख डॉ. पवन साळवे यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मार्च-एप्रिलसारखी वाढ दिसून आलेली नाही. गेल्या महिन्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या २३ हजाराच्या वर होती. आता रुग्णसंख्या २१ हजारांच्या खाली आलेली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सध्या ५हजार ९९० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १४ हजार ९३० रुग्ण गृहविलगीकऱणात आहेत.

वायसीएम रुग्णालयाचे डीन डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितलं की सध्या रुग्णालयात फक्त २५ ऑक्सिजनयुक्त बेड्स उपलब्ध आहेत तर एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही. त्यांनी सांगितलं की, व्हेंटिलेटर बेड रिक्त होण्याची शक्यता फार कमी आहे. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना अचानक त्रास होतो. मग त्यांना आयसीयूमध्ये हलवावं लागतं. आयसीयूमधल्या व्हेंटिलेटर बेड्ससाठी रुग्णांना मोठी प्रतिक्षा करावी लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 4:34 pm

Web Title: there are 1400 oxygenated beds available in pimpri chinchwad area vsk 98
Next Stories
1 दीपिका पादूकोणच्या वडिलांनी केली करोनावर मात; प्रकृती बिघडल्यानं रूग्णालयात केलं होतं दाखल
2 २ वर्षांपर्यंत पगार, मुलांसाठी शिक्षण, ५ वर्षांचा आरोग्यविमा… कोविड काळात बजाज ऑटोचा मोठा निर्णय!
3 “…अजिबात गरज नाही,” सोशल मीडियासाठी सहा कोटी खर्च करण्याचा निर्णय अजित पवारांकडून रद्द
Just Now!
X