सालाबादप्रमाणे यंदाही बारामतीमधील गोविंद बागेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीकरांबरोबर आणि आपल्या समर्थकांबरोबर दिवाळी साजरी केली. हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पवारांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले होते. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनाही यावेळी पवारांची भेट घेतली. पवारांची भेट घेतल्यानंतर एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना रोहित यांनी या भेटीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. गोविंद बागेत पवारांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेली गर्दी ही पवारांच्या कामाची पोचपावती असल्याचे मत रोहित यांनी व्यक्त केले. शरद पवारांकडून सगळ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असंही यावेळेस रोहित यांनी म्हटले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी पहिल्यांदाच उघडपणे राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले रोहित पाटील हे पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीमध्ये दाखल झाले होते. या भेटीनंतर बोलताना त्यांनी “गोविंदबागेमध्ये पहिल्यांदाच पवारांना शुभेच्छा द्यायला आलो आहे. गेल्या पन्नास वर्षांमध्ये शरद पवार हे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रीय आहेत. त्यांच्या कार्याची खरी पोचपावती आज मला बघायला मिळाली आहे,” असं मत व्यक्त केलं. तसचे पवार यांच्या भेटीमुळे आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळाल्याचेही रोहित यांनी सांगिलं. “या वयामध्ये शरद पवार उभं राहून शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाची भेट घेतात. शरद पवारांकडून सगळ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आज मी त्यांना गोविंदबागेत भेटल्यानंतर शिकतो ती म्हणजे, न थकता अवितरत काम करायचं असतं,” असं मत रोहित यांनी व्यक्त केलं.

तरुणांना काय संदेश द्याल असा प्रश्न रोहित यांना विचारला असता त्यांनी “समाजकारण जरुर करावं पण त्याआधी स्वत:च्या पायावर उभं रहावं. स्वत:च्या कुटुंबाला उभं करावं मगच समाजकारणामध्ये उतरावं,” असं मत व्यक्त केलं.

रोहित पाटील

विधानसभा निडवणुकीबद्दल म्हणाले…

“महाराष्ट्रातील जनतेने २०१४ पेक्षा या वर्षी अधिक चांगल्या विचारांच्या मागे उभं रहायचं ठरवलं आहे. येणाऱ्या काळात हाच प्रभाव आणखीन जास्त वाढलेला दिसेल,” असा विश्वास रोहित यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना व्यक्त केला.