राज्यातील फडणवीस सरकारने धनगर आंदोलनाचे आश्वासन पाळले नाही. मोदी, फडणवीसांनी धनगर समाजाला केवळ आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे आता जर ते ऐकत नसतील तर त्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन गुजरातमधील पटेल आरक्षणाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी सांगलीत धनगर समाजाला उद्देशून केले.

धनगर आरक्षणासाठी सांगली आरेवाडीत मंगळवारी गोपीचंद पडळकर यांच्या गटाचा दसरा मेळावा सुरु आहे. या मेळाव्यासाठी हार्दिक पटेल यांना निमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, पटेल यांनी व्यासपीठावरुन गुजरातमधील आपल्या पटेल आरक्षणासाठीच्या लढ्याची माहिती उपस्थितांना दिली तसेच धनगर आरक्षणावरुन राज्यातील फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

या मेळाव्यापूर्वी फडणवीस हे खूप ताकदवान असल्याचे आपल्याला सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना घाबरण्याचे कारण नाही कारण महाराष्ट्रात मोदी-शाहांसारखे गुंड नाहीत, अशी कडवी टीका त्यांनी मोदी-शाहंवर केली. तसेच रा. स्व. संघावरही टीका करताना संघ सर्वांची दिशाभूल करतोय असे ते यावेळी म्हणाले.

पटेल म्हणाले, जे लढतात, जे झुंजार असतात ते कधीही हारत नाहीत. मोठ्या काळानंतर का होईना पण ते जिंकतातच. आपण जर आपली आरक्षणाची लढाई नेटाने लढले तर आपला विजय निश्चित आहे. त्यामुळे या गाढवासारख्या नेत्यांना जागृत करण्यासाठी तुमचा समाज पुरेसा आहे. प्रयत्न करुनही जर ते ऐकत नसतील तर त्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे.

लोक म्हणायचे की भाजपावाले, राष्ट्रवादीवाले, काँग्रेसवाले नेते चुकीचे आहेत. मात्र, हे लोक चुकीचे नव्हते आपण चुकीचे होतो कारण आपण या गाढवांना निवडणून दिलं. सुरुवातीला गोपीचंद पडळकर यांची भेट झाली त्यावेळी त्यांना मी सांगितलं होतं की, या भाजपावाल्यांवर विश्वास ठेवू नका. कारण, ते भरवशाचे नाहीत. त्यांनी गुजरातमध्ये पटेल आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तसेच माझ्यावरच खटले दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न केला, असे यावेळी हार्दिक पटेल म्हणाले.