अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येला एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला असून पोलिसांचा तपास अद्याप सुरु आहे. १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांत सिंह तणावात असल्याने आत्महत्या केल्याचा दावा वारंवार केला जात आहे. पोलीस त्यादृष्टीने चौकशीही करत आहेत. अनेकांनी सुशांत सिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर सुशांत सिंहची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिनंदेखील त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

“मुंबई पोलीस सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहेत. त्यामुळे सीबीआयच्या चौकशीची गरज नाही,” असं प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली. यापूर्वी गुरूवारी रिया चक्रवर्ती हिनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची विनंती केली होती. इतकं मोठं पाऊल उचलण्यासाठी सुशांतवर कोणता दबाव होता हे मला जाणून घ्यायचं असल्याचं रियाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

सिनेसृष्टीत टोळीवाद – शेखर सुमन

सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्ये प्रकरणीअभिनेते शेखर सुमन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं. “ही आत्महत्या दिसत असली तरी कोणत्याही पुराव्याशिवाय असं म्हणता येणार नाही. जी वस्तुस्थिती समोर येत आहे. त्यावरून असं दिसतंय की सुशांतवर दबाव टाकण्यात आला होता. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी केली गेली पाहिजे. सिनेसृष्टीत घराणेशाही नाही, तर टोळीवाद आहे. इथे काही लोक गुणवत्तेला दाबून टाकतात,” असा आरोप शेखर सुमन यांनी केला होता.